पुणे : वारंवार सांगूनही पतीने अनैतिक संबंध सोडले नाही. पतीकडून होणार्या त्रासाला कंटाळून विवाहितेने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर पतीने तिच्या नावाने मेरी मर्जी से कर रही हू, अशी खोटी चिठ्ठी लिहून ठेवण्याचा प्रकार समोर आला आहे. विनिता जैन (वय ३२, रा. रोजवूड सोसायटी, पिंपळे सौदागर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत हेमंतकुमार माणकचंदजी जैन Hemantkumar Manakchandji Jain (वय ५२, रा. उदयपूर, राजस्थान) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी हिमांशु दिनेश जैन (वय २५, रा. रोजवुड सोसायटी, पिंपळे सौदागर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मोठी मुलगी विनीता जैन हिचा हिमांशु जैन याच्या सोबत २२ जानेवारी २०१७ रोजी विवाह झाला. हिंमाशु जैन हा इंजिनिअर आहे. लग्नानंतर काही महिन्यांनी ते नोकरीसाठी पुण्यात आले. पिंपळे सौदागर परिसरात राहण्यास आले. लग्नानंतर विनीता ही तणावात होती. तिला ११ फेब्रुवारी २०२३ रोजी एक मुलगी झाली. सिरत असे नाव ठेवण्यात आले. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी बेडवरुन पडल्याने तिच्या डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यु झाला. तिच्या मृत्युनंतर हिंमाशु जैन विनीताचा अधिकच छळ करु लागला.
विनिता जैन हिला आपला पती हिमांशु याचे एका मुलीबरोबर अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ती माहेरी उदयपूरला गेली.
तेव्हा हिमांशु, त्याचे आईवडिल त्यांच्या घरी आले व हिमांशु आता तिच्याशी संबंध ठेवणार नाही, असे सांगून तिला पुन्हा पुण्याला घेऊन आले. त्यानंतरही हिमांशुचे अनैतिक संबंध सुरुच राहिले. फिर्यादी यांनी हिमांशु याचे अनैतिक संबंध असलेल्या दिशा हिला अहमदाबाद विमानतळावरील हॉटेलमध्ये भेट घेऊन तिला समजावून सांगितले. त्यानंतर हिमांशु विनिताला अधिक टार्चर करु लागला. हा छळ असह्य झाल्याने २५ फेब्रुवारी रोजी विनिता जैन हिने पिंपळे सौदागर येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. इतकी मोठी घटना घडल्यानंतरही हिमांशु किंवा त्याच्या आई वडिलांनी हे फिर्यादीला कळविले नाही. त्यांच्या एका नातेवाईकांनी हे फिर्यादी यांना कळविले. त्यानंतर ते पुण्यात आले. पोलिसांनी त्यांना सांगितले की, हिमांशु हा रुममध्ये असताना विनिता हिने आत्महत्या केली. घरात एक रजिस्टर मिळाले असून त्यामध्ये इंग्लिशमध्ये लिहले आहे.
ये सब कुछ मैने मेरी मर्जी से किया है. किसी की कोई गलती नही है, मेरी आखरी इच्छा है मेरे जितने भी गोल्ड और पैसा है उससे सिरत चिल्ड्रेन केअर हॉस्पिटल बनाना, छोटे बच्चे के लिए अच्छा डॉक्टर हैयर करना, असे चिठ्ठीत लिहिले होते. ही चिठ्ठी फिर्यादी यांनी पाहिली. ही चिठ्ठी विनिता हिने लिहली नसून चिठ्ठीमध्ये नावामध्ये व सहीमध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे. जे विनिता करत नाही. तसेच त्यामध्ये मैने मेरी मर्जी से किया है हे दोन वेळा लिहिले आहे व त्यावर जोर दिला आहे. त्यामुळे तेथे मिळालेली चिठ्ठी हिमांशु याने लिहिली असून विनिता हिने लिहलेली नाही, असे फिर्यादी यांनी म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण कणसे तपास करीत आहेत.