तळेगाव डेपोमध्ये जॉब लावून देतो म्हणत डेपोतील कर्मचाऱ्यानेच केली ४३ लाखांची फसवणुक

Facebook
Twitter
WhatsApp

पिंपरी – संरक्षण खात्याच्या तळेगाव डेपो येथे कायमस्वरूपी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून डेपोत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानेच देहूगाव येथील चार जणांकडून ४३ लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी अटक केलेल्या संशयित कर्मचाऱ्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तसेच संशयिताने आणखी काही जणांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे यातील फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.सुभाष मगन पवार (५१, रा. खालुम्ब्रे, ता. खेड) असे अटक केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. कविता कैलास टिळेकर (४०, रा. श्रीकृष्ण मंदिरासमोर, माळवाडी, देहूगाव, ता. हवेली) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयिताने आर्मीचे सिम्बॉल असलेल्या पत्रावर खोट्या सह्या-शिक्क्यांचे बनावट नियुक्तिपत्र व प्रवेशपत्र देऊन नोकरी न लावता फसवणूक केली. हा प्रकार १५ ऑक्टोबर २०२३ ते ४ मार्च २०२५ या कालावधीत घडला.देहूरोड ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित पवार हा तळेगाव डेपोमध्ये पॅकर या पदावर काम करतो. गेल्या वर्षभरापासून तो कामावर गेलेला नाही. पवार याने फिर्यादी टिळेकर यांच्यासह इतर तीन लोकांना तळेगाव डेपो येथे कायमस्वरूपी नोकरी लावतो, असे सांगून शासकीय कागदपत्रे ही दाखवली. फिर्यादीसह इतरांचा विश्वास संपादन केला. फिर्यादीसह इतरांच्या मुलांना नोकरी लावण्यासाठी पवार यांनी त्यांच्याकडून एकूण ४३ लाख रुपये घेतले. तसेच, आर्मीचे सिम्बॉल असलेल्या पत्रावर खोट्या सह्या व शिक्क्यांचे बनावट नियुक्तिपत्र व प्रवेशपत्रही त्यांना दिले. मात्र, नोकरी न लावता सर्वांची फसवणूक केली.
याप्रकरणी गुन्हा दाखल करून देहूरोड पोलिसांनी संशयित पवार याला अटक केली. त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला असून संशयित पवार याने आणखी काही जणांना फसवल्याचे समोर येत आहे. यातील काही जणांनी मंगळवारी देहूरोड पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांचे जबाब नोंदवून घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणातील फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags