पुणे – मांजरी येथील एका शेतामधील गोदामात सुरु असलेल्या भेसळयुक्त पनीर कारखान्यावर गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पथक व अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला.त्यात तब्बल ११ लाख ५६ हजार ६९० रुपयांचा माल आढळून आला.गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी पोलीस अंमलदार सचिन पवार व रमेश मेमाणे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरुन अन्न व औषध प्रशासनाला पत्राद्वारे कळविले की, मांजरी खुर्द येथील माणिकनगरमधील शेतामधील गोदामामध्ये भेसळयुक्त पनीर बनविण्याचे काम सुरु आहे. या बातमीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या बरोबर पोलिसांनी या गोदामावर छापा टाकला. त्यावेळी तेथे बनावट पनीर बनविण्याचे काम चालू होते. काही पनीर बनविण्यात आले होते. पोलिसांनी तेथे एकूण १४०० किलो भेसळयुक्त पनीर, ४०० किलो जी एम एस पावडर, १८०० किलो एस एम पी पावडर, ७१८ लिटर पामतेल असा एकूण ११ लाख ५६ हजार ६९० रुपयांचा माल मिळाला. पोलिसांनी भेसळयुक्त पनीरचे नमुने तपासणीसाठी घेऊन उर्वरित भेसळयुक्त पनीर नष्ट करण्यात आले आहे. इतर माल जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासन पुढील कारवाई करीत आहे.ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार रमेश् मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, सचिन पवार, गणेश डोंगरे, बाळासाहेब तनपुरे, सुहास तांबेकर, तसेच अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील सह आयुक्त (दक्षता) डॉ़ राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण सरकटे, सहायक आयुक्त (अन्न) बालाजी शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता) अस्मिता गायकवाड, अन्न सुरक्षा अधिकारी सुप्रिया जगताप, एल डब्ल्यु साळवे यांनी केली आहे.