पुणे – आरटीई द्वारे प्रवेश घेत असताना बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी १८ पालकांविरोधात बावधन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शिक्षण विभागाकडून संबंधित पालकांवर खोटी माहिती दिल्या प्रकरणी आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार जानेवारी २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत माताळवाडी भूगाव येथे घडला आहे. पालकांनी पाल्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी रहिवासी पुरावा म्हणून बनावट कागदपत्रे सादर केली आहेत. मात्र, शिक्षण विभागाने केलेल्या छाननीमध्ये या पालकांचे बिंग फुटले आहे. याप्रकरणी मुळशीच्या गट शिक्षण अधिकारी सुजाता देशमाने यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार १८ पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन चंद्रकांत भोसले (वय-३४), खंडू दिलीप बिरादार (वय-३३), रामकृष्ण तानाजी चोंधे (वय-४०), सुमित सुरेश इंगवले (वय-३४), विजय सुभाष जोजारे (वय-३४), मंगेश गुलाब काळभोर (वय-४३), रोहिदास मारुती कोंढाळकर (वय-३६), श्रीधर बाबुराव नागुरे (वय-३८), बाबासाहेब छबुराव रंधे (वय-४०), विलास रामदास साळुंखे (वय-३४), गणेश राजाराम सांगळे (वय-३५), रुपेश बाळकृष्ण सावंत (वय-३८), दिगंबर पंडित सावंत (वय-४०), चंदन अंकुश शेलार (वय-४४), कुंभराम सांगिलाल सुतार (वय-३३), मंगेश झगुलाल गुरव (वय-३३), विवेक जयवंत जोरी (वय-३०), उमेश हिरामण शेडगे (वय-४०) अशी गुन्हा दाखल झालेल्या पालकांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यातील काही बड्या खासगी शाळांमध्ये आरटीई अंतर्गत सुमारे ९५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. शिक्षण विभागाने केलेल्या छाननीमध्ये १८ आरोपी पालकांनी त्यांच्या पाल्यांचा खोटा रहिवासी पुरावा सादर करून २५ टक्के अंतर्गत प्रवेश घेतल्याचे समोर आले. याप्रकरणी बावधन पोलीस अधिक तपास करीत आहेत.
