पुणे – जुन्या भांडणाच्या कारणावरुन धमकाविल्याची तक्रार दिल्याच्या रागातून एकाने महिलेची ओढणी ओढून विनयभंग केला. पालघन उगारुन गुन्हा मागे घे नाही तर नवर्याचा मर्डर करीन अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.याबाबत एका २७ वर्षाच्या महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रोहित आल्हाट याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या धुणे भांडीची कामे करतात. तर त्यांचे पती टिंबर मार्केटमध्ये हमाली करतात. ८ मार्च रोजी फिर्यादी व त्यांचे पती भावसार मंगल कार्यालयाजवळ उभे होते. त्यावेळी जुन्या भांडणाच्या रागातून रोहित आल्हाट याने त्यांना शिवीगाळ करुन अॅट्रोसिटी कायद्याखाली खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. त्यावरुन आल्हाट याच्याविरुद्ध लोहियानगर पोलीस चौकीत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.फिर्यादी या ९ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता घरासमोर गप्पा मारत बसल्या होत्या. त्यावेळी रोहित आल्हाट हा तेथे आला. त्यांना इतर महिलांच्या समोर अश्लिल शिवीगाळ करु लागला. त्यांनी शिवीगाळ करु नको, असे सांगितले असता त्याने फिर्यादी यांच्या अंगावरील ओढणी ओढून त्यांना स्पर्श करुन विनयभंग केला. नंतर पालघन काढून ती उगारुन ‘काल तुझ्या नवर्याने माझ्याविरोधात दिलेली तक्रार मागे घ्यायला सांग. नाहीतर, तुमच्यावर अॅट्रोसिटी कायद्यान्वये खोटा गुन्हा दाखल करीन, तुझ्या नवर्याचा मर्डर करीन, अशी धमकी देऊन निघून गेला. पोलीस उपनिरीक्षक यशवंत पडवळे तपास करीत आहेत.