राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
पुणे: चारित्र्याच्या संशयावरून ‘त्या’ दिवशी ‘माधव’ याच्या डोक्यात सैतान संचारला होता. त्यातूनच त्याने तीन वर्षांच्या निष्पाप मुलाचा ब्लेड आणि चाकूने गळा कापून निर्घृण खून केला.
त्यानंतर शांत झालेल्या या नराधमाने आपले हैवानी कृत्य लपविण्याची पुरेपूर खबरदारी घेतली. त्यासाठी त्याने दुकानातून नवीन कपडे खरेदी केले आणि रक्ताचे डाग पडलेले कपडे कचराकुंडीत टाकले.
मुलाचा खून करण्यापूर्वी माधवने एका दुकानातून ब्लेड, चाकू आणि हँडवॉश खरेदी केले होते. एकंदर, माधव याने शांत डोक्याने मुलाचा खून केल्याचे दिसून येते. रक्ताचे डाग पडलेले त्याचे कपडे, चाकू पोलिसांनी जप्त केला आहे.
माधव साधुराव टिकेटी (वय 38, रा. रतन प्रेस्टिज बिल्डिंग, तुकारामनगर, चंदननगर) असे खून करणार्या नराधम आयटी अभियंता पित्याचे नाव आहे, तर हिम्मत माधव टिकेटी (3 वर्षे) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत मुलाची आई स्वरूपा माधव टिकेटी (30) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शुक्रवारी (दि. 21) दुपारी नगर रोड दर्ग्याच्या बाजूला पराशर सोसायटी विमानतळ परिसरातील निर्जनस्थळी हिम्मतचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला मुलगा बेपत्ता झाल्याचा बनाव, उडवा-उडवीची उत्तरे देत माधव याने पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याच्या निर्दयी कृत्याचा काही लेखाजोखा सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला होता. त्याचाच धागा पकडून चंदनगर पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत माधवला अटक केलीमुलाचा मृतदेह शवविच्छेदनानंतर त्याची आई स्वरूपा टिकेटी यांच्या ताब्यात देण्यात आला असून, त्यांच्या मूळ विशाखापट्टनम गावी अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुरुवारी (दि. 20) दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी नराधम माधव सात वर्षांची मुलगी शाळेतून येणार असल्यामुळे तिला बसमधून घेण्याच्या बहाण्याने बाहेर पडला. या वेळी त्याने मुलगा हिम्मतला सोबत घेतले. त्यानंतर 13 वाजून 37 मिनिटांनी तो एका बारमध्ये गेला. या वेळी हिम्मत त्याच्यासोबतच होता. त्या ठिकाणी माधव याने मद्यप्राशन केले. अंदाजे 2 वाजून 8 मिनिटांनी तो तेथून बाहेर पडला.
2 वाजून 25 मिनिटांनी खराडी बायपास परिसरातील माधव कृष्णा सुपर मार्केटमधून ब्लेड, चाकू आणि हँडवॉश खरेदी केले. 5 वाजून 25 मिनिटांनी तो संघर्ष चौकापुढील द्वारका गार्डन परिसरातून लिंगा या कपड्याच्या दुकानातून माधव याने नवीन कपडे खरेदी केले. दुकानातच त्याने कपडे बदलले. त्याच्या पूर्वीच्या कपड्यावर रक्ताचे डाग पडलेले होते. दुकानदाराच्या निदर्शनास हा प्रकार आला होता. परंतु, कदाचित त्याला समजले नसावे.
माधव याने रक्ताने माखलेले कपडे एका कचराकुंडीत फेकून दिले. त्यानंतर तो खराडी येथील स्टे लॉजवर जाऊन झोपला होता. दुसरीकडे मुलगा आणि पती दोघे बेपत्ता झाल्याने स्वरूपा यांनी शोधाशोध सुरू केली होती. परंतु, दोघे कोठेच मिळून आले नाहीत. शिवाय माधव याचा मोबाईल देखील बंद लागत होता. शेवटी स्वरूपा यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
तेव्हा तो एकटा दिसून आला…
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषनाद्वारे माधव याला लॉजवरून शोधून काढले. त्याच्याकडे चौकशी केली, तेव्हा त्याने पोलिसांना आपण सिगारेट पीत असताना हडपसर बसस्थानक परिसरातून हरवला आहे. पोलिसांना माधवच्या बोलण्यात वेगळाच संशय आला. दुपारी अडीच वाजेपर्यंत माधव याच्यासोबत हिम्मत होता. परंतु, पाच वाजता कपड्याच्या दुकानात तो जेव्हा गेला, तेव्हा तो एकटाच दिसून आला. दोन ते अडीच तासांच्या वेळेत त्याने निष्पाप हिम्मतचा खून केला. शेवटी पोलिसी खाक्या दाखवताच आपण पत्नीवरील चारित्र्याच्या संशयावरून मुलगा हिम्मत याचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि त्याने फेकून दिलेले कपडे जप्त केले आहेत.