
पुणे: आंबेगाव परिसरात घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. गुन्हेगारांकडून ६.६६ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, त्यांच्याविरुद्ध आंबेगाव, भारती विद्यापीठ व सिंहगड पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या चार गुन्ह्यांची उकल झाली आहे.
दिनांक १६ मार्च २०२५ रोजी रात्री संतोषी माता मंदिर परिसरातील बंद घर फोडल्याची घटना घडली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आयुष संजय खरात (२०, रा. सुखसागरनगर) व आयाम कैसल अयानाले (२३, रा. गोळीकनगर) या दोघांना अटक केली.
तपासादरम्यान त्यांच्या ताब्यातून २२ ग्रॅम सोन्याचे दागिने, चार मोबाईल फोन्स, मोटारसायकल आणि रिक्षा असा ६.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) मनोहरसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.









