पुणे (प्रतिनिधी):
मौजे म्हातोबा आळंदी, ता. हवेली, जि. पुणे येथील गायरान भूखंड क्र. ३९७, खाते क्र. ८५६ व कोळसकर वस्तीमध्ये अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या अनुसूचित जाती-जमाती व इतर समाजातील गरीब कुटुंबांना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तोंडी नोटीस देऊन घर हटविण्याचा तगादा लावल्याने तीव्र संताप निर्माण झाला आहे. या अन्यायकारक प्रकाराविरोधात लहुजी शक्ती सेनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी लहुजी शक्ती सेना पुणे जिल्हा कोअर कमिटी अध्यक्ष विजय विठ्ठल सकट, दादासाहेब कसबे, उपाध्यक्ष संजय रणदिवे, कार्याध्यक्ष गणेश थोरात, पुणे शहर कार्याध्यक्ष चैतन्य शिरोळे आणि म्हातोबा आळंदीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले की, शासन परिपत्रक क्रमांक प्रआयो-२०१८/प्र.क्र.२५६/योजना-१० नुसार गायरान व इतर शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाबाबत योग्य ती विहित प्रक्रिया राबवून नियमीकरण करणे आवश्यक आहे. परंतु स्थानिक ग्रामपंचायत व वनविभागाचे अधिकारी या प्रक्रियेचा भंग करत असून, गरीब वस्तीधारकांना तोंडी ताकीद देऊन बेघर करण्याचा प्रयत्न करत आहेत.
या कुटुंबांचे हातावरचे पोट आहे. त्यांच्या पुनर्वसनाविना घर हटवले गेल्यास त्यांचे जीवन उद्ध्वस्त होईल. संविधानाने दिलेला अन्न, वस्त्र व निवारा हा मुलभूत अधिकार आहे. त्याची पायमल्ली केल्यास लहुजी शक्ती सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांनीही या निवेदनाची गंभीर दखल घेत चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.