राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
थेऊर प्रतिनिधी:
थेऊर व नायगाव येथील भिल्ल समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. स्वातंत्र्यानंतर प्रथमच या समाजाला जातीचे दाखले मिळाले असून, एकूण २०० कुटुंबांना अधिकृत प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली.
गेल्या पन्नास वर्षांपासून या भागात वास्तव्यास असलेला भिल्ल समाज मासेमारी व पारंपरिक वाद्य वाजविणे या व्यवसायावर उदरनिर्वाह करीत होता. मात्र शासनाच्या योजनांचा लाभ न मिळाल्यामुळे समाज अनेक अडचणींना सामोरा जात होता. अखेर ग्रामपंचायत सदस्य आरोग्यदूत युवराज काकडे व माजी सदस्य विनोद माळी यांनी सातत्याने पाठपुरावा करून आमदार ज्ञानेश्वर कटके यांचे सहकार्य मिळवले आणि समाजाची दीर्घकालीन मागणी पूर्ण झाली.

या कार्यक्रमाला तहसीलदार सौ. तृप्ती कोलते पाटील व उपविभागीय अधिकारी यशवंत माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी उपस्थित राहणार होते; मात्र नियोजित कारणास्तव ते हजर राहू शकले नाहीत.
कार्यक्रमात बोलताना युवराज काकडे म्हणाले, “आज भिल्ल समाजाला खरी ओळख मिळाली आहे. पुढील पिढी आता शिक्षण घेऊन प्रगतीपथावर जाईल. शासनाच्या योजनांचे दरवाजे समाजासाठी उघडले आहेत.”

सोहळ्यास महसूल विभागाचे अधिकारी, मंडल अधिकारी किशोर जाधव, महसूल अधिकारी सौ. सरला पाटील, तसेच स्थानिक मान्यवर, ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संदीप बोडके (प्रिंट व डिजिटल मीडिया अध्यक्ष, हवेली) व गणेश कुंजीर (सामाजिक कार्यकर्ते) यांचे विशेष सहकार्य लाभले.

जातीचे दाखले मिळाल्यानंतर भिल्ल समाजातील नागरिकांनी जल्लोष केला व प्रशासन तसेच सहकार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.









