गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात धुमाकूळ : नाना पेठेत गोळीबार, गोविंदा कोमकरचा खून

Facebook
Twitter
WhatsApp
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
पुणे :.प्रतिनिधी
गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील नाना पेठ परिसर रक्तरंजित खुनानं हादरला आहे. गोविंदा कोमकर (Govinda Komkar) याच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार करून हत्या केली. या घटनेनं पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गेल्या वर्षी १ सप्टेंबर २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांची हत्या करण्यात आली होती. आज गोविंदा कोमकर याच्या खुनामागे त्याच हत्येचा बदला असल्याचा प्राथमिक संशय पोलिस व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे, वनराज आंदेकर आणि गोविंदा कोमकर हे सख्खे मामा-भाचे होते.
वनराज आंदेकर हत्याकांडानंतर कोमकर कुटुंबातील गणेश कोमकर (गोविंदाचा वडील), जयंत कोमकर (काका) आणि संजीवनी कोमकर (काकू) हे तुरुंगात आहेत. आता गोविंदाचा खून झाल्यानं कोमकर आणि आंदेकर यांच्यातील वैर पुन्हा डोकं वर काढत असल्याचं दिसतं.
मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदा कोमकरवर नाना पेठेत तीन गोळ्या झाडण्यात आल्या. गंभीर जखमी झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले असून, पोलिसांनी संपूर्ण भागात नाकेबंदी केली आहे.
वनराज आंदेकर ज्या भागात मारला गेला होता, त्याच्या अगदी जवळ ही घटना घडल्यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण झालं आहे. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने हजेरी लावली असून, मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
या घटनेनं विसर्जन मिरवणुकीवर परिणाम होणार का, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र भाजपचे कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी, “पोलिस प्रशासन योग्य कारवाई करेल. विसर्जन मिरवणुकीत कुठलाही अडथळा येणार नाही याची दक्षता घेतली जाईल”, असं आश्वासन दिलं आहे.
🔹 मुख्य मुद्दे :
नाना पेठेत गोविंदा कोमकरवर गोळीबार करून हत्या.वनराज आंदेकर हत्येच्या बदल्याची शक्यता.मामा-भाचा दोघांचा एका वर्षात खून.पुण्यात टोळीयुद्धाची भीती’ वाढली.विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags