सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी जवळील वेणेगाव येथे रविवारी रात्री गाणी लावण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून थेट गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, टेंभुर्णी परिसरातील एका कला केंद्रात गाणी लावण्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला. हा वाद चिघळत जाऊन एवढ्या टोकाला पोहोचला की एका तरुणाने प्रतिस्पर्ध्यावर गोळी झाडली. पंढरपूरजवळील वाखरी गावचा देवा नावाचा तरुण गोळीबारात जखमी झाला असून गोळी त्याच्या डाव्या मांडीला लागली आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडील पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेमुळे सोलापूरसारख्या शांत शहरात मोठी खळबळ उडाली असून कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेआहे.