
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
जेजुरी (ता. पुरंदर):
धार्मिक स्थळांवर होणाऱ्या प्रदूषणाविरुद्ध सामाजिक बांधिलकी जपत हडपसर येथील रुद्रतेज ढोल ताशा पथक पुढाकार घेत आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या जेजुरीतील कऱ्हा नदीकाठावर मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या कचऱ्याची स्वच्छता मोहिम नुकतीच पथकातील वादकांनी राबविली. या उपक्रमात तब्बल तीन ट्रॅक्टर निर्माल्य व प्लास्टिक गोळा करून त्याच्या योग्य विघटनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

गणेश विसर्जनानंतर कऱ्हा नदीकाठी नारळ, देवप्रतिमा, प्लास्टिक पिशव्या, निर्माल्य इत्यादी कचऱ्याचे ढिगारे जमा झाले होते. सामाजिक कार्यकर्त्या मनीषा खेडेकर यांच्या सूचनेनुसार पथकाने पुढाकार घेत या घाटावर स्वच्छता मोहिम उभी केली.
या उपक्रमाला श्री मार्तंड देव संस्थांनचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांची उपस्थिती लाभली. तसेच रुद्रतेज ढोल ताशा पथकाचे अमित गायकवाड, राहुल निकम, प्रसाद मर्गम, माऊली कुडले, सुनील माळी, कपिल गायकवाड, सिद्धार्थ सरोदे, समीर मगर, सनी बारवकर, सिद्धांत शिंदे, आशिष मगर आणि ज्ञानयोग सेवा संस्थेचे कार्यकर्ते सक्रिय सहभागी झाले.

डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी सांगितले की,
> “जेजुरीतील कऱ्हा नदी हा अत्यंत पवित्र घाट असून सोमवती अमावस्येला खंडोबाच्या पालखीचे स्नान सोहळे येथे होत असतात. स्वच्छतेअभावी श्रद्धाळूंच्या मनात नकारात्मकता निर्माण होते. त्यामुळे या घाटाचे पावित्र्य टिकविणे ही आपली जबाबदारी आहे.”

रुद्रतेज ढोल ताशा पथकाचे प्रमुख अमित गायकवाड यांनी माहिती देताना सांगितले की,
> “आमच्या पथकातील तरुणाई ही फक्त ढोल ताशा वादनापुरती मर्यादित नाही. समाजातील स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व सेवाभाव जागृत ठेवण्यासाठी आम्ही सतत उपक्रम राबवत आहोत. जेजुरीतील कऱ्हा नदीकाठी केलेली स्वच्छता मोहीम हा त्याचाच एक भाग आहे.”
या उपक्रमामुळे धार्मिक श्रद्धेला पावित्र्याची जोड मिळाली असून, तरुणाईने उचललेले सामाजिक जबाबदारीचे पाऊल सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.









