
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
माढा/पुणे :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे यांच्या वतीने माढा लोकसभा मतदारसंघातील मुंगशी, नाडी, कुर्डुवाडी, आष्टी तसेच पुणे जिल्ह्यातील थेऊर भागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या तब्बल 2000 किटचे वाटप करून दसरा सण गोड करण्यात आला.
या उपक्रमाबाबत स्थानिक बांधवांनी समाधान व्यक्त करताना, “सणासुदीला दिलेली ही मदत आम्हाला नवी ऊर्जा देणारी आहे” अशी भावना व्यक्त केली.
यावेळी पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे म्हणाले,
“महाराष्ट्रातील सोलापूर, पंढरपूर, अहिल्या नगर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक गावांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले आहेत. धन, धान्य, जनावरे, कपडे, साहित्य यांची प्रचंड हानी झाली आहे. अशा वेळी मदत ही दान नाही, तर कर्तव्य आहे ही भावना ठेवून आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. मी सुरुवात केली आहे, आता आपण सर्वांनीही हातभार लावावा.”
ते पुढे म्हणाले,
“या आपत्तीजनक प्रसंगी पूरग्रस्त बांधवांना धान्य, किराणा, कपडे, चादरी, बेडशीट, शालेय साहित्य अशा वस्तूंची तातडीने गरज आहे. आपण प्रत्येकाने आपल्या परीने मदतीचा हात दिल्यास या संकटातून हजारो कुटुंबांना आधार मिळेल. आपला सण आपण बांधवांसोबत साजरा करूया.”
या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते रोहन बारस्कर व त्यांचे सहकारी, बापू सोनवणे, प्रशांत कल्याणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची साथ दिली.









