
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा.
थेऊर (ता. हवेली) :
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुका जवळ येताच थेऊर–आव्हाळवाडी गटात उमेदवारांनी मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू केल्या आहेत. भव्य यात्रांचे आयोजन, क्रीडा स्पर्धा, आरोग्यसेवा, व्यक्तिगत संपर्क, आणि लाखो रुपयांची उधळण—या सर्वांमुळे गटात चुरशीचे वातावरण निर्माण झाले आहे. मतदारांना प्रभावित करण्यासाठी प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीने वेगळेपण जपत आहे.
◇ कोमल संदेश आव्हाळे : काशी–अयोध्या यात्रेतून भक्कम जनसंपर्क
आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटातून इच्छुक उमेदवार कोमल संदेश आव्हाळे यांनी सर्वप्रथम काशी–अयोध्या यात्रेचे मोठे आयोजन करून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याची मोहिम सुरू केली.
गटातील नागरिकांकडून अर्ज भरून घेणे
6 ते 11 नोव्हेंबर दरम्यान पहिला टप्पा पूर्ण
दुसरा टप्पा सुरू
एकूण 7,000 ते 8,000 नागरिकांना काशी–अयोध्या दर्शन
या यात्रांमध्ये नाश्ता, जेवण, राहण्याची व्यवस्था अशा सर्व सुविधा उत्तम दिल्याने कोमलताईंनी संपूर्ण मतदारसंघात एक फेरी पूर्ण केली आहे.
या यात्रांच्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढला असून ते स्पर्धेच्या आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
◇ सीमाताई प्रकाश सावंत : 90 लक्झरी बसेसमधून उज्जैन दर्शन; तरुणांसाठी क्रिकेट स्पर्धा
सीमाताई प्रकाश सावंत यांनीही मतदारांमध्ये मजबूत छाप निर्माण करण्यासाठी उज्जैन महाकाल यात्रेचे नियोजन भव्य प्रमाणात केले.
90 स्लीपर कोच लक्झरी बसेस
साडेतीन ते चार हजार नागरिकांना दर्शन
वेळेवर जेवण–नाश्ता
निवास व्यवस्थेपासून इव्हेंट व्यवस्थापनापर्यंत उत्तम नियोजन
या यात्रेमुळे नागरिकांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला आहे.
यासोबतच गटातील गावांमध्ये आयोजित क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करुण व बक्षिसांची देणगी देऊन सीमाताईंनी व प्रकाशशेठ यांनी तरुण वर्गालाही आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले आहे.
लक्झरी बसेसमधून प्रथमच उज्जैन दर्शनाचा अनुभव मिळाल्याने त्यांची लोकप्रियता आणखी वाढलेली दिसते.
◇ पूनम अशोक गायकवाड : बाळूमामा–महालक्ष्मी–ज्योतिबा यात्रांमधून वाढती पकड
पूनम अशोक गायकवाड यांनीदेखील मतदारांना आकर्षित करण्यासाठी आदमापूर बाळूमामा, कोल्हापूर महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिर यात्रांचे आयोजन केले.
60 लक्झरी बसेस
मोठा महिलावर्ग–वृद्ध–तरुणांचा सहभाग
उत्तम भोजन–निवास–प्रवासनियोजन
या यात्रांमुळे त्यांचे मतदारांशी नाते घट्ट झाले असून जनसंपर्क जोरात वाढताना दिसतो आहे. वारंवार गावांच्या भेटी, सतत संपर्क ठेवणे या गोष्टींमुळे त्यांच्या पाठीराख्यांची संख्या वाढत आहे.
◇ पल्लवीताई युवराज काकडे : ‘देवदर्शन नाही, जनकल्याण’—आरोग्य शिबिरे ठरली ताकद
पल्लवीताई युवराज काकडे यांनी मात्र इतरांपेक्षा संपूर्ण वेगळा मार्ग निवडला आहे.
त्यांचे पती युवराज नाना काकडे—‘आरोग्यदूत’ म्हणून ओळखले जातात आणि पल्लवीताईही त्याच धाटणीचे काम करत आहेत.
त्यांच्या मोहीमेची वैशिष्ट्ये—
संपूर्ण जिल्हा परिषद गटभर आरोग्य शिबिरांचे आयोजन
मोठ्या हॉस्पिटलची बिले कमी करण्यात मदत
रुग्णांना तत्काळ सहकार्य
सार्वजनिक कामांवर भर
पहिल्याच मेळाव्यात त्यांनी स्पष्ट सांगितले होते :
मी कोणतीही ट्री देवदर्शन यात्रा काढणार नाही मी फक्त जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणार.
थेऊरगाव हे गटातील सर्वाधिक मतदार असलेले गाव आहे.मुळा–मुठा नदीमुळे गट दोन भागांत विभागतो—एका बाजूला एकच उमेदवार, तर दुसऱ्या बाजूला तीन उमेदवार , त्यामुळे पल्लवीताईंची लढत आणखी मजबूत होते.
◇ निवडणूक जाहीर होण्याआधीच ‘मतदारांची चंगळ’ — अंतिम निर्णय मात्र मतदारच घेणार
गटात सध्या यात्रांचा वर्षाव, क्रीडा स्पर्धांचा उत्साह, आरोग्य सेवा, विविध उपक्रम—यामुळे मतदारांची चंगळ झालेली दिसते.
निवडणूक अधिकृतपणे जाहीर होण्याआधीच प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने मतदारांचा कौल मिळवण्यासाठी कसून प्रयत्न करत आहे.
परंतु शेवटी—
मतदारच राजा
आणि
जिल्हा परिषदेत कोण पाठवायचे हे त्यांच्याच हातात आहे.









