
हवेली | प्रतिनिधी | राष्ट्रहित टाईम्स
हवेली तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा मांजरीखुर्द–आव्हाळवाडी–वाघोली (MDR 56) हा प्रमुख जिल्हा मार्ग गेल्या अनेक दिवसांपासून अक्षरशः दयनीय अवस्थेत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक झाले असून, वारंवार छोटे-मोठे अपघात घडत आहेत. या परिस्थितीमुळे वाहनचालक, शालेय विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या गंभीर समस्येची दखल घेत आरोग्यदूत युवराज काकडे यांनी सदर रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) कडे निवेदनाद्वारे केली आहे. PMRDA चे अतिरिक्त आयुक्त श्री. दिपक सिंगला यांना निवेदन सादर करून रस्त्याच्या सध्याच्या अवस्थेमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
सदर रस्ता काही महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) PMRDA कडे वर्ग करण्यात आला असून, सध्या या रस्त्याची संपूर्ण जबाबदारी PMRDA कडे आहे. पुढील काळात या रस्त्यासाठी UGC योजनेअंतर्गत निधी मंजूर करून जमीन अधिग्रहणानंतर अंदाजे एका वर्षाच्या कालावधीत काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. मात्र, तोपर्यंत रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असल्याने तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने होत होती.
- यासंदर्भात PMRDA अधिकाऱ्यांनी लवकरात-लवकर दुरुस्तीची निविदा काढून रस्त्याचे काम सुरू केले जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती आरोग्यदूत युवराज काकडे यांनी दिली. त्यामुळे या मार्गावरील नागरिक व वाहनचालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.










