
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असला, तरी हा कार्यक्रम जाहीर होण्याच्या कित्येक महिने आधीच जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघांमध्ये इच्छुक उमेदवारांनी “निवडणूक जिंकण्यासाठी काहीही करा” या मानसिकतेतून जोरदार तयारी सुरू केलेली दिसून आली. देवदर्शन, क्रीडा स्पर्धा, महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’सारखे कार्यक्रम, तसेच विविध प्रकारची प्रलोभने व अमिषे दाखवून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रकार गेल्या तीन ते चार महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर घडताना दिसले.
आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा असते. मात्र प्रत्यक्षात येणाऱ्या काळातही मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल, दबाव तंत्र, दहशत आणि गैरप्रकार सुरूच राहतील, अशी भीती व्यक्त होत आहे. निवडणूक काळात गुंडगिरी, दादागिरी, धमकीचे प्रकार वाढलेले असून, मागील निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या उमेदवाराच्या पतीची हत्या होणे ही घटना आजही समाजमनाला हादरवणारी आहे.
लोकशाहीचा उत्सव म्हणून पाहिल्या जाणाऱ्या निवडणुका, आज अनेक ठिकाणी लोकशाहीचा उत्सव न राहता स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याचा संघर्ष बनत चालल्या आहेत. निवडून येण्यासाठी सर्व मार्ग योग्य, आणि निवडून आलो नाही तर समोरच्याला नेस्तनाबूत करण्याची मानसिकता वाढत आहे. हे चित्र पाहता, पूर्वी उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्ये घडणाऱ्या घटना आज फुले–शाहू–आंबेडकरांच्या महाराष्ट्रात घडत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे.
यात आणखी गंभीर बाब म्हणजे, कोणताही राजकीय पक्ष याला अपवाद राहिलेला नाही. बहुतांश पक्षांनी ज्या उमेदवारांना उमेदवारी दिली आहे, त्यामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार, आरोपी किंवा संशयित आरोपी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. “आम्ही गुन्हेगारांचे समर्थन करत नाही” असे सांगत असतानाच, त्याच गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना उमेदवारी देणे ही उघड विसंगती आहे. अशा परिस्थितीत केवळ घोषणांनी किंवा दिखाऊ भूमिका घेऊन लोकशाही वाचणार नाही.
येणारा काळ हा केवळ राजकीय पक्षांसाठी नाही, तर मतदारांसाठीही मोठ्या आव्हानाचा काळ आहे. कारण मतदानाच्या माध्यमातून मतदार आपला लोकप्रतिनिधी निवडतो—जो आपले प्रश्न मांडेल, आपले हक्क मिळवून देईल आणि सामान्य माणसाच्या बाजूने उभा राहील. मात्र जर निवडून येणारे लोकप्रतिनिधी गुंडगिरी करणारे, दहशत माजवणारे, किंवा पैशाच्या जोरावर सत्ता मिळवणारे असतील, ज्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाणही नसेल, तर ती लोकशाहीची थट्टा ठरेल.
म्हणूनच येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदारांनी कोणत्याही दबावाला, प्रलोभनांना किंवा भीतीला बळी न पडता, जो उमेदवार आपल्याला न्याय देईल, आपली बाजू सक्षमपणे मांडेल आणि लोकशाही जिवंत ठेवेल, अशाच उमेदवाराला मतदान करणे हीच आजच्या घडीला लोकशाही वाचवण्याची खरी गरज आहे.
लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर मतदार जागरूक हवा—कारण लोकशाहीचा खरा पहारेकरी मतदारच असतो.










