राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
थेऊर (प्रतिनिधी) :
थेऊर–आव्हाळवाडी जिल्हा परिषद गट तसेच थेऊर–कुंजीरवाडी–म्हातोबाची–आळंदी पंचायत समिती गणाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची दिशा ठरवण्यासाठी आणि पुढील रणनिती निश्चित करण्यासाठी संयुक्त प्रचार नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक रविवार दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजता, विश्व बँक्वेट हॉल, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची रोड येथे पार पडणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिकृत चिन्ह व उमेदवारी अंतिम झाल्यानंतर पुढील प्रचार यंत्रणा अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारंपरिक वर्चस्व असल्यामुळे, पक्षाचे चिन्ह व उमेदवारी मिळालेला उमेदवार हमखास निवडून येणार, असे समीकरण अनेक वर्षांपासून तयार झाले आहे. त्यामुळे यंदा उमेदवारीसाठी मोठी चुरस निर्माण झाली होती.
अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवारांची घोषणा करत —
कोमलताई संदेशशेठ आव्हाळे – थेऊर–आव्हाळवाडी जिल्हा परिषद गट
सुषमाताई संतोष मुरकुटे – कोलवडी–आव्हाळवाडी पंचायत समिती गण
युवराज हिरामण काकडे – थेऊर–कुंजीरवाडी–म्हातोबाची–आळंदी गण
अशी उमेदवारी निश्चित केली आहे.
विशेष म्हणजे, या उमेदवारांनी अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच प्रचार यंत्रणा मजबूत करत प्रत्येक गावात घराघरांत अनेक वेळा संपर्क साधून जनतेमध्ये आपली पकड निर्माण केली आहे. आता अधिकृत चिन्ह प्राप्त झाल्यानंतर ही उमेदवारी अधिक प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचवणे, प्रचारात शिस्त आणणे, कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन देणे आणि संघटन मजबूत करणे, या उद्देशाने ही नियोजन बैठक होत आहे.
दरम्यान, पक्षातील अंतर्गत मतभेद दूर करण्यासाठीही सकारात्मक प्रयत्न करण्यात आले आहेत. थेऊर–कुंजीरवाडी गावचे माजी सरपंच सचिन तात्या तुपे यांनीही आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करणार असल्याचे स्पष्ट करत, युवराज नाना काकडे, संदेश शेठ आव्हाळे व सुषमाताई मुरकुटे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
🔸 बैठकीला विशेष महत्त्व
या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजीन-माजी पदाधिकारी, वरिष्ठ नेते तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, ते बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. प्रचार यंत्रणा अधिक सक्षमपणे राबवण्यासाठी सर्वजण प्रत्यक्ष सहभागी होणार असल्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
ही बैठक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देणारी ठरेल, असे जाणकारांचे मत आहे.
या बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कोमलताई संदेश आव्हाळे व युवराज नाना काकडे यांनी केले आहे.











