राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कार्यकर्त्यांवर सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांच्या तक्रारीवरून १५ ते २० कार्यकर्त्यांविरोधात संबंधित कायद्यान्वये कारवाई सुरू झाली असून, या घटनेमुळे राजकीय वर्तुळांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
हे प्रकरण त्या घटनेशी संबंधित आहे ज्यामध्ये महिला पोलीस अधिकारी अंजली कृष्णा यांना कारवाई थांबविण्यासाठी अजित पवार यांनी थेट फोन करून दबाव टाकल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पवार म्हणताना ऐकू येतात, “तुम्हारी इतनी हिम्मत… मैं ऍक्शन लुंगा”. या संवादानंतर कार्यकर्ते व अधिकाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याच पार्श्वभूमीवर महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर १५ ते २० कार्यकर्त्यांवर अवैध उत्खननात हस्तक्षेप व सार्वजनिक कामकाजात अडथळा आणल्याचे आरोप ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणावरून विरोधकांनी अजित पवारांवर पदाचा गैरवापर करून अधिकारी वर्गावर दबाव आणल्याचा आरोप केला आहे. सामाजिक कार्यकर्ती अंजली दमानिया यांनीही पवारांनी महिला अधिकाऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी याला “अजित पवारांना चुकीचा रंग देण्याचा राजकीय कट” असे म्हटले आहे.
दरम्यान, या कारवाईनंतर शेतकरी संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनीही प्रकरणावर लक्ष ठेवले असून, आंदोलनाची शक्यता नाकारली जात नाही. स्थानिक प्रशासनाच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने हा प्रकार प्रशासनिक व राजकीय संघर्षाचे धक्कादायक उदाहरणठरत आहे.









