घरफोडी व वाहन चोरीचे तीन गुन्हे उघडकीस; आरोपीविरुद्ध सहा गुन्ह्यांचा पूर्वइतिहास
पुणे, दि. १३ : खराडी परिसरात भाजी विक्रेत्या महिलेच्या बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या अट्टल घरफोड्या गुन्हेगाराला खराडी पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. या आरोपीकडून तब्बल ₹५,४०,९७५ किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, घरफोडी व वाहन चोरीचे मिळून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
खराडी पोलिस ठाण्यातील गुन्हा रजि. क्र. ९६/२०२५ अंतर्गत दि. २५ मे रोजी एका भाजी विक्रेत्या महिलेच्या घरफोडीची घटना घडली होती. आरोपीने घराचे कुलूप तोडून तब्बल ₹६,४६,००० किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण व पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय रविंद्र गोडसे आणि पीएसआय राहुल कोळपे यांच्या दोन पथकांची नियुक्ती करण्यात आली होती.
या तपासादरम्यान पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दि. १ सप्टेंबर रोजी बंडु ऊर्फ राहुल श्यामसुंदर मोहाडे (३५, रा. पठारे ठुबे नगर, खराडी) याला सापळा रचून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला एकूण १३ दिवसांची पोलीस कोठडी दिली. चौकशीत त्याच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, सात मोबाईल फोन व तीन मोटारसायकली असा साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
तपासात आरोपीकडून घरफोडीप्रमाणेच खराडी (गुन्हा रजि. क्र. १५६/२०२५) व लोणीकंद (गुन्हा रजि. क्र. ३४६/२०२५) या दोन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच आरोपीविरुद्ध मालमत्ता चोरीचे आणखी सहा गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे. मोटारसायकलींच्या नंबर प्लेटमध्ये बदल करून गुन्हे केल्याचेही तपासात स्पष्ट झाले असून, त्याविरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम ३३६ (२), ३३६ (३), ३(५) अन्वये कलमे वाढवण्यात आली आहेत.
या कारवाईत एपीआय गोडसे, पीएसआय कोळपे, तसेच पोलीस अंमलदार श्रीकांत शेंडे, महेश नाणेकर, सुरेंद्र साबळे, वसीम सय्यद, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, विलास केदारी आणि जयवंत श्रीरामे यांनी सहभाग नोंदवला. ही संपूर्ण कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोजकुमार पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.