पुणे – स्वारगेट पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी देशी बनावटीच्या पिस्तुलाचा वापर करून खूनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना अटक करून मोठे यश मिळवले आहे. ही घटना ४ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री घडली होती.
स्वारगेट पोलीस स्टेशन गु.र.नं. ९३/२०२४ अंतर्गत भादंवि कलम ३०७, ३४ सह आर्म अॅक्ट कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१)/१३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांमार्फत तपासादरम्यान दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान पोलिसांनी प्राप्त माहितीच्या आधारे प्रकाश ऊर्फ पक्का तुकाराम पवार (वय २३, रा. सालीम अली रस्ता, हडपसर, पुणे) या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल, जिवंत काडतूस आणि खूनाच्या प्रयत्नात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.
तपासात उघडकीस आले की, गुन्ह्याच्या दिवशी वादातून देशी पिस्तुलातून गोळी झाडून खूनाचा प्रयत्न करण्यात आला होता. आरोपींच्या विरुद्ध ठोस पुरावे मिळाल्याने पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पी. एम. (गुन्हे) आणि स्वारगेट पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
ही यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) श्री. सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपआयुक्त श्री. मनोज पाटील, सहायक आयुक्त श्री. सतीश गायकवाड, श्री. विशाल हिरे, पो.नि. अमोल माने, अमर जाधव व त्यांच्या पथकाने विशेष परिश्रम घेतले.