१८ बुलेट जप्त – १८ हजारांचा दंड वसूल
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा (प्रतिनिधी) :
लोणी काळभोर
मोठमोठ्याने कर्णकर्कश आवाज काढत आणि फटाक्यांसारखे स्फोटक धडधडाट करत बुलेट दुचाकी चालविणाऱ्या “टवाळखोर बुलेटराजांवर” लोणी काळभोर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. या मोहिमेत तब्बल १८ बुलेट दुचाकी जप्त करून त्यांच्या चालकांकडून ₹१८,००० दंड वसूल करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या तक्रारी पोलिसांकडे वारंवार प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी विशेष पथके तयार करून धडक मोहीम उभी केली. दि. ३० ऑगस्ट २०२५ रोजी पोलिसांनी हद्दीत गस्त घालत कारवाई केली असता, १८ बुलेट दुचाकींवर कंपनीऐवजी मॉडिफाईड सायलेंसर लावलेले आढळले.
वाहतूक शाखेच्या सहकार्याने कायदेशीर कारवाई करत सर्व गाड्यांवर दंड वसूल करण्यात आला असून, मॉडिफाईड सायलेंसर व कर्णकर्कश हॉर्न काढून टाकून कंपनीचे सायलेंसर बसविण्यात आले.
ही कारवाई मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ-५ डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, सहा. पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे, तसेच वाहतूक विभागाचे सतिश टेंगले आणि सचिन कांबळे यांच्यासह लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
या कारवाईनंतर परिसरातील बुलेटराजांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही अशा प्रभावी मोहिमा सुरूच राहतील, असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिला.