पुणे – लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पथकाने जबरी चोरी करणाऱ्या चार आरोपींना केवळ दोन तासांच्या आत अटक करत मोठी कामगिरी बजावली आहे. या आरोपींकडून एकूण ३ लाख ४२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना चाप बसला आहे.
अशी घडली घटना
दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास नामदेव विकास पवार (वय २३, धंदा – सिक्युरिटी गार्ड, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे. मूळगाव – उदतपूर, ता. लोहारा, जि. धाराशिव) हे रिक्षा (एमएच १२ केआर २०७०) करून घरी जात होते. पुणे-सोलापूर महामार्गावर श्री दत्त मिसळ हॉटेल समोरील भागात रिक्षा थांबताच, रिक्षाचालकासह इतर तीन जणांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांना रिक्षाबाहेर ढकलले व गंभीर जखमी केले.
यानंतर आरोपींनी पवार यांच्या खिशातील मोबाईल फोन (किंमत – १८ हजार रुपये), पाकीट आणि पाकिटातील ३,५०० रुपयांची रोख रक्कम असा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली.
दोन तासांत आरोपी अटकेत
तपासादरम्यान पोलीस शिपाई बाजीराव विर, शैलेश कुदळे, पाटील, चक्रधर शिरगीरे यांना मिळालेल्या खबरीवरून पोलिसांनी तात्काळ सापळा रचला. अवघ्या दोन तासांत संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
अटक आरोपींची नावे
1. अदिल लतीफ शेख (वय २४, रा. गल्ली नं. २१, सय्यदनगर, हडपसर, पुणे)
2. हबीब सिराज शेख (वय २१, रा. गल्ली नं. २१, सय्यदनगर, हडपसर, पुणे)
3. बबलु मुन्नालाल अग्रवाल (वय १९, रा. गल्ली नं. ३, सय्यदनगर, हडपसर, पुणे)
4. रोहन युनुस शेख (वय १७, रा. गल्ली नं. २४, सय्यदनगर, हडपसर, पुणे)
पहिले तिघे प्रौढ आरोपी असून त्यांना ९ सप्टेंबर रोजी दुपारी १.४५ वाजता अटक करण्यात आली. तर चौथा आरोपी हा विधी संघर्षित बालक असल्याने त्याला बालसुधारगृहाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मोठा मुद्देमाल जप्त⋅
लोणी काळभोर पोलिसांनी या आरोपींच्या ताब्यातून मोबाईल फोन, रोख रक्कम व ऑटो रिक्षा मिळून एकूण ३,४२,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वरिष्ठांचे मार्गदर्शन व पथकाची कामगिरी
ही संपूर्ण कारवाई पोलीस उपायुक्त (परिमंडळ-५) डॉ. राजकुमार शिंदे आणि सहायक पोलीस आयुक्त (हडपसर विभाग) सौ. अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, गुन्हे निरीक्षक सौ. स्मिता पाटील, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, दिगंबर सोनटक्के तसेच पोलीस कर्मचारी सातपुते, वणवे, माने, जगदाळे, देवीकर, कुंभार, गाडे, कर्डीले, सोनवणे, शिरगिरे, दडस, पाटील, कुदळे, विर यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली.