मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) प्रकरणातून आपले नाव वगळण्याची मागणी केली आहे. बीडच्या विशेष न्यायालयाने त्याचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्यानंतर कराडने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
या प्रकरणात सरपंच संतोष देशमुख यांचे खंडणीच्या वादातून अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. तपास यंत्रणेनुसार कराडला या टोळीचा म्होरका मानले जात असून त्याच्यावर सात गंभीर गुन्ह्यांसह तब्बल वीसहून अधिक गुन्हे दाखल आहेत. बीड न्यायालयाने त्याला या प्रकरणातील मुख्य सूत्रधार घोषित करत जामीन आणि दोषमुक्तीची मागणी फेटाळली होती.
कराडच्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाने प्रकरण गांभीर्याने घेत पुढील सुनावणी १९ सप्टेंबर २०२५ रोजी ठेवली आहे. दरम्यान, तपास एसआयटी व सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून सुरू असून कराडवर खंडणीसाठी धमक्या देणे, साक्षीदारांना प्रभावित करण्याचे प्रयत्न करणे तसेच बेकायदेशीर मार्गाने संपत्ती जमा करण्याचे आरोप आहेत. त्याच्या नावावर मोठ्या प्रमाणात शेतीजमीन, घरे व प्लॉट असल्याचे समोर आले असून आर्थिक व्यवहारांचीही चौकशी न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे.
विशेष न्यायालयाने दिलेल्या आदेशात, “पात्र पुराव्यांच्या आधारे दोषमुक्तीची शक्यता कमी आहे” असे स्पष्ट करण्यात आले होते. याच कारणावरून त्याचा अर्ज फेटाळण्यात आला होता. तथापि, कराडचा दावा आहे की त्याचे नाव चुकीने या गुन्ह्यात घेतले गेले असून त्याला अन्यायकारकपणे अडकविण्यात आले आहे.या
प्रकरणावर स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून ग्रामस्थांत संतापाची लाट आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.
आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ सप्टेंबरला होणार असून, त्याकडे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था यंत्रणा आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.