पुणे | दुचाकीला घास लागल्याच्या वादातून टोळक्याची तरुणाला डोंगरावर नेऊन मारहाण

Facebook
Twitter
WhatsApp
५ आरोपींना अटक, ९ जणांवर गुन्हा दाखल
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
पुणे : दुचाकी गाडी घासल्याच्या किरकोळ वादातून एका १७ वर्षीय तरुणाला गुंडांच्या टोळक्याने अक्षरशः डोंगरावर ओढत नेऊन हाताने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना कोथरुड परिसरात घडली. पोलिसांची गाडी आल्याने आरोपी पळून गेले आणि त्यातून पीडिताचा जीव थोडक्यात वाचला.
या प्रकरणी किष्किंदानगर येथे राहणाऱ्या अल्पवयीन तरुणाने कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली असून ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक झालेल्यांमध्ये समर्थ जगताप (१८), अभिषेक घारे (१९), निरज सातपुते (१९), कौशल केमसे (२०), आदित्य वाघमारे (१९, सर्व रा. श्रावणधारा वसाहत, कोथरुड) यांचा समावेश आहे. त्यांच्या इतर चार साथीदारांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकार कसा घडला?
८ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास फिर्यादी आयडियल कॉलनी येथील नवकेतन सोसायटीमध्ये थांबले असता आरोपी दुचाकीवर आले. जुन्या वादातून त्यांनी शिवीगाळ सुरू केली आणि समर्थ जगताप याने फिर्यादीच्या डोक्यात दुचाकीची चावी मारली. इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यानंतर जखमी अवस्थेत त्याला जबरदस्ती गाडीवर बसवून गणंजय सोसायटी परिसरात नेण्यात आले, जिथे इतर साथीदार आधीच थांबले होते. तेथे पुन्हा मारहाण करून गोपीनाथनगर येथील डोंगरावर नेण्यात आले. तिथेही हल्ला सुरू असतानाच योगायोगाने एक पोलिस कर्मचारी तिकडे येताना दिसला. त्याला पाहून आरोपींनी पळ काढला.
जखमी तरुणाला पोलिसांनी वारजे चौकीत नेले व त्यानंतर ससून रुग्णालयात दाखल केले. उपचार घेतल्यानंतर त्याने फिर्याद नोंदवली.
आरोपींचा गुन्हेगारी इतिहास
पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले समर्थ जगताप, अभिषेक घारे, निरज सातपुते आणि कौशल केमसे यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. उर्वरित आरोपी अल्पवयीन आहेत. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags