पुणे ग्रामीण पोलिसांनी अल्पवयीन मुलींचे अपहरण, महिलांवर लैंगिक अत्याचार व जबरी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आंतरराज्यीय टोळीचा म्होरक्या बेताब उर्फ शिवम उर्फ शुभम आनंद पवार (वय ५०, रा. क्रांतीनगर, हनुमान टेकडी, कुसगाव, ता. मावळ, जि. पुणे) याला अटक करून मोठा दिलासा दिला आहे.
हा सराईत आरोपी गेली दोन वर्षे पोलिसांच्या नजरेआड होता. त्याच्यावर पुणे ग्रामीण जिल्ह्यात ४, गुजरातमध्ये २ व कर्नाटकमध्ये १ असे एकूण ७ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलांचे अपहरण, महिलांवर लैंगिक अत्याचार, जबरी चोरी आणि अमानुष वागणुकीचे गंभीर गुन्हे समाविष्ट आहेत.
गुन्ह्यांचा तपशील
आरोपी पवारने एका महिलेला चाकूचा धाक दाखवून पळवून नेले होते. तिच्याकडील मोबाईल व रोख रक्कम लुटून वारंवार लैंगिक अत्याचार केले.
पीडितेसोबत दोन अल्पवयीन बालकांना साखळीने बांधून कैदेत ठेवण्यात आले होते. त्यांना उपाशी ठेवून काम करायला लावले जात होते.
या प्रकारांमुळे लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलमे ३७६, ३६३, ३९४, ३२४, ३२३, ५०४, ५०६ तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते.
कारवाईची कहाणी
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा, लोणावळा शहर व ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तपास सुरू ठेवला. आरोपी कलबुर्गी (कर्नाटक) येथे असल्याची माहिती मिळताच पथकाने मालखेड पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. त्याला पुण्यात आणून न्यायालयात हजर करण्यात आले असून ५ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व योगदान
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पो.नि. राजेश रामाघरे, लोणावळा ग्रामीण पो.नि. दिनेश तायडे यांच्यासह अनेक अंमलदारांचे विशेष योगदान राहिले.