
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
शिरूर (ता. पुणे) — दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून मित्राचा गळा आवळून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पाण्यात फेकून पळून गेलेल्या आरोपीस शिरूर पोलिसांनी केवळ १२ तासांच्या आत परजिल्ह्यातून बेड्या ठोकण्यात यश मिळवले आहे.
शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील प्रितमप्रकाश नगर, पांजरपोळ परिसरात दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी पाण्याने भरलेल्या खड्ड्यात अशोक तात्या खंडागळे (वय ३१, रा. बोराडेमळा, शिरूर) याचा मृतदेह आढळून आला होता. प्रारंभी हा प्रकार अकस्मात मृत्यू म्हणून नोंदवण्यात आला होता. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालात मृतदेहावर मृत्यूपूर्वीच्या जखमा असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी तपास सुरू केला.
तपासादरम्यान मिळालेल्या साक्षीदारांच्या जबाबांनुसार व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे असे निष्पन्न झाले की, मृत अशोक खंडागळे याला त्याचा मित्र आकाश ज्ञानेश्वर लोहार (वय २५, रा. प्रितमप्रकाश नगर, शिरूर) व त्याचा एक साथीदार यांनी दारू पिण्यासाठी श्रद्धा बार, शिरूर येथे बोलावले होते. दारूच्या नशेत तिघांमध्ये वाद झाला आणि त्यातून रागाच्या भरात आकाश लोहार व त्याच्या साथीदाराने अशोक खंडागळे याचा गळा आवळून निर्घृण खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पाण्यात फेकून ते पळून गेले.
या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक नाथसाहेब जगताप यांच्या फिर्यादीवरून गु.र. नं. ७२५/२०२५ भा.दं.सं. २०२३ चे कलम १०३, २३८, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाने तांत्रिक तपास, साक्षीदारांचे जबाब आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. दरम्यान, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी आकाश लोहार हा सोलापूर जिल्ह्यातील कौठाळी गावात असल्याचे समजले. तत्काळ सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याबरोबर असलेला साथीदार हा विधीसंघर्षित बालक असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींकडून चौकशी घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आकाश लोहारला न्यायालयात हजर केले असता, १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. तर विधीसंघर्षित बालकाला बालन्याय मंडळ, येरवडा येथे हजर करण्यात आले.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, दिलीप पवार, हवालदार नाथसाहेब जगताप, अक्षय कळमकर, अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, निखील रावडे, निरज पिसाळ, अंबादास थोरे, सचिन भोई, अजय पाटील व रविंद्र काळे यांच्या पथकाने केली.









