नेते पडले फिके, कार्यकर्त्यांचा झंझावात विजयी; राष्ट्रवादीचा ऐतिहासिक क्लीन स्वीप!

Facebook
Twitter
WhatsApp

 मतपेटीतून दिला जनतेने स्पष्ट कौल थेऊर आव्हाळवाडी गट पूर्ण राष्ट्रवादीमय

राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा

: हवेली तालुक्यातील थेऊर–आव्हाळवाडी जिल्हा परिषद गट तसेच थेऊर म्हातोबाची आळंदी आणि कोलवडी–आव्हाळवाडी पंचायत समिती गणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दणदणीत कामगिरी करत तिन्ही जागांवर विक्रमी विजय मिळवला आहे. या निकालामुळे परिसरात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून विरोधकांचा पूर्णपणे सुपडा साफ झाल्याची राजकीय चर्चा रंगली आहे.

जिल्हा परिषद गट क्रमांक ४० (थेऊर–आव्हाळवाडी) मधून कोमल संदेश आव्हाळे यांनी २२,३४३ मते मिळवत तब्बल १४,१४६ मताधिक्याने विजय संपादन केला. त्यांच्या विरोधात भाजपच्या पुष्पलता प्रकाश सावंत यांना ८,१९७ मते मिळाली. जिल्ह्यातील सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्याने हा विजय झालेला आहे.

पंचायत समिती गण क्रमांक ७९ (थेऊर) मधून युवराज हिरामण काकडे यांनी ९,१६६ मते मिळवत ५,२१२ मताधिक्याने विजय मिळवला. त्यांच्या विरोधात भाजपचे योगेश दत्तात्रय काकडे यांना ३,९५४ मते मिळाली.

तसेच पंचायत समिती गण क्रमांक ८० (कोलवडी–आव्हाळवाडी) मधून सुषमा संतोष मुरकुटे यांनी ११,२४८ मते मिळवत ५,३०५ मताधिक्याने विजय संपादन केला. त्यांच्या प्रतिस्पर्धी पुनम अशोक गायकवाड यांना ५,९८७ मते मिळाल. विजयी उमेदवाराला मिळालेले मताधिक्य हे पराभूत उमेदवाराला मिळालेल्या मतदानापेक्षाही जास्त आहे. त्यामुळे ही कोणती चुरशीची लढत अशी उपरोधित चर्चा परिसरात रंगली आहे. सुरुवातीपासून अत्यंत चुरशीची अपेक्षा असलेली ही निवडणूक प्रत्यक्षात मात्र एकतर्फी ठरल्याचे चित्र दिसून आले. भाजपने शेवटच्या टप्प्यात राज्यस्तरीय नेते, स्थानिक गटबाजी आणि एकत्रित मोर्चेबांधणी करून जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला; मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी सुरुवातीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत विजयावर शिक्कामोर्तब केले.

पहिल्याच फेरीनंतर विरोधकांची माघार स्पष्ट दिसू लागली, तर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी सुरुवातीपासूनच जल्लोष सुरू ठेवला. माजी पंचायत समिती सदस्य हिरामणतात्या काकडे आणि माजी ग्रामपंचायत सदस्य मारुतीदादा कांबळे यांची रणनीती यशस्वी ठरल्याची चर्चा परिसरात आहे.

सर्वसामान्य नागरिकांमध्ये युवराज काकडे, सुषमा मुरकुटे आणि कोमल आव्हाळे यांच्या कामाविषयी असलेला विश्वास, जवळीक आणि सातत्यपूर्ण मदतभावना हा विजयाचा निर्णायक घटक ठरल्याचे मत व्यक्त होत आहे. नेते विरुद्ध कार्यकर्ते अशी रंगलेली ही लढत अखेरीस कार्यकर्त्यांच्या बाजूने झुकल्याचे स्पष्ट झाले असून, या निकालाचे परिणाम आगामी ग्रामपंचायत निवडणुकांवरही उमटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags