
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
थेऊर (प्रतिनिधी):
“राजकारण म्हणजे केवळ भाषणे आणि आश्वासने नव्हेत, तर जनतेच्या प्रश्नांवर थेट कृती करणारे नेतृत्व आवश्यक आहे,” असे ठाम मत जिल्हा परिषद गट क्रमांक ४० (थेऊर–आव्हाळवाडी) मधील उमेदवार सौ. पल्लवी युवराज हिरामण काकडे यांनी व्यक्त केले. विकासाच्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेत त्यांनी निवडणूक रिंगणात ठामपणे उडी घेतली असून, त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
- प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना सौ. काकडे यांनी स्पष्ट केले की, थेऊर–आव्हाळवाडी परिसरात पाणीटंचाई, खराब रस्ते, आरोग्यसेवांचा अभाव, शिक्षणातील अडचणी, स्वच्छतेचे प्रश्न तसेच महिलांच्या मूलभूत समस्या आजही गंभीर स्वरूपाच्या आहेत.
“ही परिस्थिती बदलण्यासाठी केवळ घोषणा नव्हे, तर ठोस नियोजन आणि प्रत्यक्ष कामाची गरज आहे,” असे त्या म्हणाल्या.
घराघरांत जाऊन नागरिकांच्या समस्या समजून घेणे, त्या प्रश्नांची नोंद घेणे आणि त्यावर उपाययोजना आखणे यावर त्यांनी भर दिला आहे.
“सत्तेचा उपयोग केवळ पदासाठी नव्हे, तर जनतेच्या कामासाठी केला पाहिजे. जनतेने संधी दिल्यास पारदर्शक, जबाबदार आणि कामकेंद्रित कारभार करून विकास प्रत्यक्षात दाखवू,” असा ठाम विश्वास सौ. काकडे यांनी व्यक्त केला.
महिलांचे प्रश्न, युवकांसाठी संधी, ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य व ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा यांना प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून सौ. पल्लवी युवराज हिरामण काकडे यांच्याकडे पाहिले जात आहे.
थेऊर–आव्हाळवाडी गटात “बोलणारे नाही, काम करणारे नेतृत्व” हवे अशी भावना मतदारांमध्ये बळावत असून, येत्या निवडणुकीत थेट कृती करणाऱ्या उमेदवारालाच संधी देण्याचा निर्धार नागरिकांमध्ये दिसून येत आहे.










