राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
कोरेगाव पार्क येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये झालेल्या गोंधळ प्रकरणी शिंदे गटाच्या पुणे शहरातील पदाधिकारी अजय भोसले यांच्यासह सुमारे ३० ते ४० समर्थकांविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनाक्रम:
३१ जुलै रोजी अजय भोसले यांनी आपल्या समर्थकांसह बेकायदेशीररीत्या जमाव जमवून हॉस्पिटल परिसरात गोंधळ घातला. जमावाने रुग्णालयाच्या व्यवस्थापन अधिकाऱ्यांवर पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांचा मारा केला. याचदरम्यान, महिला आरोपी — आशा ओव्हाळ, सुनिता भालेराव व गीता गोपाले — यांनी संबंधित अधिकाऱ्याच्या अंगावर धाव घेत त्यांचे जॅकेट ओढून धक्काबुक्की केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
धमकीचे प्रकार:
या गोंधळादरम्यान संबंधित अधिकाऱ्याला “तुमच्या नावाने खोट्या तक्रारी दाखल करू, ॲट्रॉसिटी लावू” अशी धमकीही देण्यात आली. त्यामुळे हॉस्पिटल परिसरात भीतीचे व तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
तक्रार आणि कारवाई:
या प्रकरणी कर्नल रवी कुमार यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली असून, त्यांच्या तक्रारीवरून अजय भोसले व इतर आरोपींविरोधात संबंधित भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .