
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
थेऊर (ता. हवेली) | प्रतिनिधी
युवराजनाना काकडे हे नाव केवळ थेऊर किंवा एखाद्या गावापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर संपूर्ण पंचक्रोशीत विश्वास, कामाची खात्री आणि तत्परतेचे प्रतीक बनले आहे. महसूल विभागाचे काम असो, ग्रामपंचायतीशी संबंधित प्रश्न असोत, वीज वितरण (MSEB) असो वा पाणीपुरवठा विभाग—कोणत्याही क्षेत्रातील कोणतेही काम नानांकडे सांगितले आणि ते मार्गी लागले नाही, असा अनुभव आजवर कुणालाही आलेला नाही, हेच त्यांच्या कार्याची खरी पावती आहे.
सर्वसामान्य नागरिकांचा अनुभव सांगतो की, एखाद्या व्यक्तीने फोन केला किंवा प्रत्यक्ष भेटून समस्या मांडली, की युवराजनाना काकडे त्या कामाला स्वतःचे समजून तातडीने पाठपुरावा करतात. काम कोणाचेही असो, गरज सर्वसामान्यांची असेल, तर नानांकडून ते काम प्रलंबित राहत नाही. त्यामुळेच पंचक्रोशीत त्यांचा मोठा मित्रपरिवार, कार्यकर्त्यांचा मजबूत गोतावळा आणि जनसमुदाय तयार झाला आहे.
युवराजनाना काकडे हे विकासाशी नाते जोडणारे नाव म्हणून ओळखले जातात. अलीकडेच त्यांनी देऊळगाव व उरगाव परिसरात एक महत्त्वाकांक्षी व समाजोपयोगी उपक्रम हाती घेतला आहे. अनेक ठिकाणी गोरगरिबांच्या घरांसमोर स्ट्रीट लाईट पोहोचलेले नाहीत, काही ठिकाणी लाईट आहेत पण बल्ब बंद आहेत. अशा ठिकाणी अंधारामुळे महिलांना, वृद्धांना व लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
ही परिस्थिती लक्षात घेऊन युवराजनाना काकडे यांनी स्वखर्चातून अशा घरांसमोर प्रकाश पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. एखाद्या घरासमोर अंधार असल्याची माहिती मिळताच ते तात्काळ आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी बल्ब बसवणे, लाईट सुरू करणे, अथवा प्रकाशाची व्यवस्था करून देतात. ज्या ठिकाणी कधीच प्रकाश पोहोचला नव्हता, त्या ठिकाणी उजेड पडताना दिसत आहे.
या उपक्रमामुळे युवराजनाना काकडे यांची ओळख केवळ आरोग्यदूत किंवा विकासदूत म्हणूनच मर्यादित न राहता, आता ते ‘प्रकाशदूत’ म्हणूनही ओळखले जाऊ लागले आहेत. गोरगरिबांच्या घरासमोर प्रकाश पोहोचवणे म्हणजे केवळ लाईट लावणे नाही, तर सुरक्षितता, आत्मविश्वास आणि सन्मान देण्याचे काम नानांच्या माध्यमातून घडत आहे.
येणाऱ्या काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत असून, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवराजनाना काकडे यांचे कार्य अधिकच चर्चेत आले आहे. आरोग्याच्या प्रश्नांवर धावून जाणारा, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गोरगरिबांच्या घरात पाणी पोहोचवणारा, विजेच्या समस्यांवर मदत करणारा आणि घरासमोर प्रकाश देणारा असा सर्वसामान्यांचा खरा आधार म्हणून नानांकडे पाहिले जाते.
त्यामुळेच “सर्वसामान्यांच्या अडचणींसाठी एकाकी धाव घेणारा माणूस” अशी त्यांची प्रतिमा समाजमनात तयार झाली असून, येणाऱ्या निवडणुकांमध्ये समाज त्यांच्या कार्याची पोचपावती नक्कीच देईल, असा आशावाद सर्व समाजघटकांतून व्यक्त केला जात आहे.










