पुणे – घरकाम करत असताना घरातील लोक बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरी करणाऱ्या महिलेला चंदननगर पोलिसांनी अटक केली.ऋतुजा राजेश सुरुशे (रा. अॅसेम्ब्ली चर्चमागे वडगाव शेरी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.महिलेकडून ७७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ५ हजार ५०० रुपये रोख तसेच दुचाकी जप्त करण्यात आली. महिलेकडून चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.याबाबत वडगाव शेरी भागातील एका ५२ वर्षाच्या महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार महिला १७ फेब्रुवारी छत्रपती संभाजीनगर येथे कामानिमित्त गेल्या होत्या. त्या २५ फेब्रुवारी रोजी गावाहून परतल्या. त्या वेळी घरातील कपाटातून २७ ग्रॅमच्या सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आल्याचे उघडकीस आले होते. महिलेने तक्रार देताना घरकाम करणार्या ऋतुजा सुरुशे हिच्यावर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तिची अंगझडती घेतली असता तिच्याकडे ७७ ग्रॅम वजनाचे दागिने, रोकड मिळाली. तक्रारदार महिलेच्या घरातून २७ ग्रॅमचे दागिने चोरीला गेले असताना त्या पेक्षा अधिकचे दागिने तिच्याकडे कोठून आले, याची चौकशी केल्यावर खराडी येथील एका घरातून तिने ६० ग्रॅम दागिने व ५ हजार ५०० रुपये चोरल्याची कबुली दिली.ही कामगिरी पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे, सहायक निरीक्षक प्रशांत माने, उपनिरीक्षक अश्विनी पाटील, उपनिरीक्षक लक्ष्मण नवघणे, पोलीस कर्मचारी कळसाईत, गिरमे, काकडे यांनी केली आहे.
