जगभर नावलौकिक असलेले डॉ.आंबेडकर शिक्षकांसाठी प्रेरणास्रोत – ॲड.कसबे

Facebook
Twitter
WhatsApp

 

 

 

ढोकी (प्रतिनिधी):-

जातीय विषमतेच्या विळख्यात अडकलेल्या तत्कालीन समाज व्यवस्थेत माणूस म्हणून जगणे अशक्य होते. सामाजिक सुधारणेला कसालाही वाव नव्हता. तरीही बाबासाहेब आंबेडकर नावाचा महासूर्य तळपत राहिला. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सातासमुद्रापार शिक्षण घेतले आणि जगभर आपला ठसा उमटविला. त्यामुळे आज प्रत्येक क्षेत्रात त्यांची विशेष ख्याती आहे. म्हणून जगभर नावलौकिक असलेले डॉ.आंबेडकर शिक्षकांसाठी प्रेरणास्रोत आहेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध विधिज्ञ ऍड.राजू कसबे यांनी केले.

महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून तेरणा साखर कारखाना प्रशालेत ‘घर-घर संविधान’ या उपक्रमांतर्गत आयोजित व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. याप्रसंगी त्यांनी संविधान व त्यातील परिशिष्टे, विविध कायदे व त्यांचे महत्व यासह डॉ.आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला. तसेच विद्यार्थ्यांच्या दृष्टीने बाबासाहेबांचे विविध पैलू मांडले. यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थी शिक्षक काहीसे भावूक झाले होते.

पुढे बोलताना ऍड.कसबे म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर हे कोट्यावधी अनुयायांच्या जगण्याची ऊर्जा, प्रेरणा आणि श्वाससुद्धा आहेत. जगाच्या इतिहासात अनेक विचारवंत, क्रांतिकारक होऊन गेले, परंतु प्रतिकूल परिस्थितीवर मात करून इतिहासच बदलून नव्याने इतिहास लिहून आधुनिक भारताचा नकाशा जगासमोर आणणार्‍या आंबेडकर नावाच्या प्रकांड पंडिताला अख्ख जग सॅल्यूट करते. कारण, त्यांनी संयम, चिकाटी, जिद्द, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर कित्येक आयुष्यांचं काम एकाच आयुष्यात करून ते यशस्वी केलं. विशेष म्हणजे त्यांच्यामुळे हजारो वर्षांच्या रूढी परंपरेतून दलित, उपेक्षित, वंचित, शेतकरी, भटके, कष्टकरी, आदिवासी वर्गासह महिलांना स्वातंत्र्य मिळाले.

 

बाबासाहेबांनी अस्पृश्यांच्या मूलभूत हक्कांसाठी चवदार तळे सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, काळाराम मंदिर, अंबाबाई मंदिर सत्याग्रह असे लढे दिले. वंचित समाजाच्या जीवनात मोठे परिवर्तन करून सामाजिक क्रांतीचा आविष्कार घडविला. म्हणून त्यांना जगातील समतेचे महान क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. बाबासाहेबांनी जगातील सर्वात मोठे लोकशाहीवादी संविधान लिहून भारत हे सार्वभौमवादी राष्ट्र निर्माण केले. त्यांचे विविध विषयांवर प्रभुत्व होते. समाजकारण, राजकारण, अर्थकारण, कृषी, कामगार, धर्म, संस्कृती, शिक्षण, उपेक्षितांचे संरक्षण, सार्वभौमत्व, कायदा, संविधान, विकास, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, संघटन, संघर्ष, भौतिक सुविधा या विषयांवरचा त्यांचा व्यासंग दांडगा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक पैलूंवर स्वतंत्र ग्रंथ, खंड होऊ शकतात, असेही ऍड.कसबे यांनी सांगितले.

 

देशातील सर्व नागरिकांना समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि समान संधी प्रदान करणाऱ्या संविधानाच्या निर्मितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मूलभूत अधिकार, संघराज्य रचना आणि अल्पसंख्याक आणि वंचितांसाठी संरक्षण यासारख्या महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी विशेषत: धार्मिक स्वातंत्र्य, अस्पृश्यता निर्मूलन आणि शोषणापासून संरक्षण यांसारख्या अधिकारांवर भर दिला. एक मजबूत केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये अधिकारांचे विभाजन सुनिश्चित करण्यासाठी बाबासाहेबांनी संघराज्य पद्धतीचे समर्थन केले. तसेच अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण सुद्धा केले. ते न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाज सुधारक देखील होते. त्यांनी दलित, उपेक्षित, वंचित, महिला आणि कामगारांच्या हक्कांसाठी आपले जीवन समर्पित केले, असेही गौरवोद्गार ऍड.कसबे यांनी काढले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनार्दन सुरवसे तर सूत्रसंचालन परशुराम राऊत यांनी केले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक संजय पाटील,

पर्यवेक्षक श्रीरंग लिंगे, दादासाहेब चौरे, जनार्दन सुरवसे, उत्तरेश्वर चव्हाण, परशुराम राऊत, शिवाजी वाघमारे, सुर्यकांत नाईक, शैलेंद्र माहोर यांच्यासह प्रशिक्षणार्थी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags