
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
सोरतापवाडी (दि. …)
महाविद्यालयीन जीवन हा भविष्यातील देशउभारणीचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून युवकांमधील ऊर्जेचा सकारात्मक वापर झाल्यास राष्ट्राच्या समग्र विकासाला चालना मिळते, असे प्रतिपादन सोरतापवाडीच्या सरपंच मा. सुनिताई चौधरी यांनी केले.
त्या समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.
यावेळी शिबिरार्थी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना सरपंच सुनिताई चौधरी म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी देशसेवेचे व्रत अंगीकारून या शिबिराच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य करावे व शिबिर यशस्वी करावे.
कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते कारभारी चौधरी यांनी सोरतापवाडी गावातील विविध विकासकामांची माहिती देत स्वच्छता, वृक्षारोपण तसेच इतर लोकोपयोगी उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
उपसरपंच विलास तात्या चौधरी यांनी या शिबिरामुळे गावात समाजप्रबोधन व विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले जातील, असा विश्वास व्यक्त केला. ग्रामपंचायत सदस्य मा. सनिशेठ चौधरी यांनी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने शिबिरार्थींना सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमास भाऊसाहेब संतोष गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या मा. शितलताई चौधरी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सतीश कुदळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संभाजीराव निकम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सौ. स्नेहा हिंगमिरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सुहास नाईक यांनी मानले.









