पुणे (प्रतिनिधी):-
सध्याचा काळ फार सुपरफास्ट झाला आहे. हातात आलेल्या फाईव्ह जी मोबाइलने कौटुंबिक व सामाजिक संवादास आव्हान दिले आहे. वर्तमान समाजाचा प्रवास आपण ऐवजी मी असा होतोय. काळ आणि माणसं सुध्दा बदलत आहेत. मानवी मनाच्या संवेदना बोथट झाल्या आहेत. अशा वेळी सामाजिक बांधिलकी जोपासून काम करणारा कार्यकर्ता हताश व निराश होतो. त्यामुळे त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकून प्रोत्साहन देणे आवश्यक असते. त्यासाठी असे पुरस्कार ऊर्जा व आत्मविश्वास वाढवतात. त्यामुळे पुरस्कार समाजाप्रती झटण्याची प्रेरणा देतो, असे प्रतिपादन शाहीर महादेव खंडागळे यांनी केले.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून शहरातील पंडीत जवाहरलाल नेहरू सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात शाहीर खंडागळे यांना राज्यस्तरीय मानवाधिकार पुरस्काराने गौरविण्यात आले. त्या पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सुध्दा सन्मानित करण्यात आले. मानवी हक्क संरक्षण जागृती संस्था, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने हे पुरस्कार बहाल करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, न्यायमूर्ती सोनल पाटील, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर, घटनातज्ज्ञ उल्हास बापट आणि प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना शाहीर खंडागळे म्हणाले की, इतिहासातील सर्व महापुरुषांच्या प्रेरणेने क्रांती घडत असते. त्यामुळे त्यांचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणे आपल्या पिढीची जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही समविचारी मंडळींनी जागर रयतेचा कलापथक व विधायक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून थोडेफार काम केले आहे. ते करताना कधीही आणि कोणत्याही लाभाची अपेक्षा केली नाही. तरीही आपण नोंद घेवून पाठीवर थाप दिली. त्यामुळे भविष्यात आणखी जोमाने काम करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे.
आपला देश एका मोठ्या संक्रमणातून जात आहे. लोकशाही व संविधान धोक्यात असल्याच्या अनेक घटना घडत आहेत. जातीय विद्वेष आणि धार्मिक उन्माद वाढत आहे. त्यामुळे सर्व महापुरुषांनी सांगितलेला मानवतावाद समाजात खोलवर रूजविणे काळाची गरज आहे. याची जाणीव ठेवून माणूस या नात्याने आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. चुकीच्या घटना आणि विचारांविरूध्द सशक्त लढा उभारला पाहिजे. तरच सामाजिक एकोपा अबाधित राहील, असेही शाहीर महादेव खंडागळे यांनी सांगितले.
माणूस संवेदनशील असला की, समाजाच्या व्यथा आणि वेदना अधिक चांगल्या समजू शकतात. असे लोक सामाजिक सेवेत असले की, शोषितांचा आवाज बनतात, त्याचबरोबर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करतात. परंतु त्यांना योग्य वेळी प्रोत्साहन व पाठींबा मिळाला पाहिजे. मात्र, सध्याच्या काळात तसे होताना दिसत नाही. हे सामाजिक चळवळींचे दुर्दैव आहे, अशीही खंत शाहीर महादेव खंडागळे यांनी आवर्जून व्यक्त केली.
जातीधर्माच्या भिंतीपलीकडे एक माणूस म्हणून आणि माणुसकी म्हणून एक नाते असते. माणूस जन्माला आल्यापासून त्याच्याभोवती जातीधर्माच्या भिंती घातल्या जातात आणि त्यामध्ये माणूस म्हणून जगण्याचे आत्मभान विसरून जातो. परंतु जातीधर्मापलीकडे ‘मानव’ ही एकमेव जात सांभाळली पाहिजे, असेही आवाहन शाहीर महादेव खंडागळे यांनी केले.
दरम्यान, महादेव खंडागळे हे गेली अनेक वर्ष सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच विविध संघटना व संस्थांच्या माध्यमातून त्यांनी चळवळींमध्ये लक्षणीय योगदान दिले आहे. जागर रयतेचा कलापथक व विधायक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध समाज घटकांसाठी ते काम करीत आहेत. त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल लहुजी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिपकभाऊ लोंढे, प्रमोदभाऊ लोंढे, सामाजिक कार्यकर्ते सचिन बगाडे, नागेश गायकवाड, प्रा.सुहास नाईक, आनंद वैराट, संकेत दादा खंडागळे, प्रा.आनंद साठे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
राज्यघटनेमुळे माणसाच्या
जगण्याला किंमत मिळाली!
भारतीय राज्यघटना ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली अमूल्य देणगी आहे. या राज्य घटनेमुळेच माणसाला माणसाची किंमत मिळाली व माणूस म्हणून जगण्याची संधी मिळाली. त्याच संविधानिक हक्काचे संरक्षण करण्यासाठी मानवी हक्क अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे त्या अभियानास पाठींबा देवून सहभागी होणे, ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे, असेही शाहीर महादेव खंडागळे यांनी सांगितले.