राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
मुंबई (प्रतिनिधी) – राष्ट्रीय चर्मकार संघ (रजि.) यांच्या वतीने शनिवार, दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी धारावी, मुंबई येथे वीर कैकयां महाराज, संत शिरोमणी रविदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, माता सावित्रीबाई फुले, माता फातिमा शेख आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरूपात पार पडला.
या मेळाव्यात चर्मकार समाज व त्यांच्या विविध उपजातिंचे – कैकय्या, हराळ्या, चांभार, ढोर, मादीगी, मोची, खाटीक, अहिरराव, महेकर तसेच परप्रांतीय समाजबांधव – मोठ्या संख्येने उपस्थित होते. चर्मकार समाजाचे आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक सक्षमीकरण साधणे आणि समाजाच्या अस्मिता, अस्तित्व व हक्कांसाठी एकत्रित लढा उभारण्याचा निर्धार यानिमित्ताने करण्यात आला.
यावेळी माजी आमदार बाबुराव माने यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले की, “देशभरातील चर्मकार व उपजातींच्या सुमारे १०० ते १२५ समाज घटकांना एकत्र आणून त्यांच्या उज्वल भविष्याकरिता अखंड आवाज उभारण्याची वेळ आली आहे.” त्यांनी केंद्र व राज्य सरकारकडून चर्मकार समाजासाठी निधी अर्पण केल्यास तो इतरत्र वळवू नये, यासाठी संयुक्तपणे लढण्याचे आवाहन केले.
नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री सूर्यकांत गवळी यांनी शासनाच्या अनुसूचित जाती विकास मंडळ, संत रविदास चर्मोद्योग महामंडळ व समाजकल्याण खात्याच्या माध्यमातून येणाऱ्या निधीचा योग्य आणि समाजहितार्थ वापर होण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी बौद्ध व मातंग समाजाच्या उपजातींना न्याय मिळावा, त्यांच्या हक्कासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी चर्मकार समाज सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहील, असे ठामपणे सांगितले.
या कार्यक्रमात समाजातील मान्यवरांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कारप्राप्त मान्यवरांमध्ये राजाभाऊ शिंदे (सोलापूर), शहाजीराव भाऊसाहेब सातपुते (मिरज-सांगली), सुधाताई श्रीपती जोगदंड, बाबुराव सोनवणे व रमाकांत नारायणे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाला सौ. आशाताई कांबळे, परशुराम इंगोले, ऍड. नारायण गायकवाड, जगन्नाथ वाघमारे, रामभाऊ कदम, संभाजी ब्रिगेडचे मुंबई अध्यक्ष सुभाष राणे आणि उद्योजक कैलासनाथ जैस्वाल यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी संघटनेच्या विविध पदांवर नव्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. माजी मंत्री श्री. सूर्यकांत गवळी (पुणे) यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, श्रीमती मीराताई शिंदे (श्रीगोंदा) यांची महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा, रामभाऊ कदम यांची उपनेते, मा. मोहनभाऊ गद्रे (पुणे) यांची Tbhi-विवाह मंडळ महाराष्ट्र अध्यक्ष, स्मिता विजय नॉर्टन यांची प्रदेश प्रवक्त्या, विलास गोरेगावकर यांची मुंबई अध्यक्ष, तर सौ. शारदा नवले यांची मुंबई महिला अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
हा ऐतिहासिक मेळावा चर्मकार समाजाच्या एकतेचा, स्वाभिमानाचा आणि उज्ज्वल भविष्यासाठीच्या प्रयत्नां
चा प्रतीक ठरला.