राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
थेऊर, ता. हवेली:
नैसर्गिक ओढे बुजवून त्यावर अनधिकृत प्लॉटिंग, शेतजमिनींचे रक्षण करण्यासाठी उभारण्यात आलेल्या विनाकारण अडथळे आणि अल्पावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे थेऊर गाव पाण्याखाली गेले आहे. न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती गावात निर्माण झाली असून शेकडो कुटुंब रस्त्यावर आले आहेत.
घराघरांत पाणी शिरल्यामुळे संसार उद्ध्वस्त झाला आहे. घरातील आवश्यक वस्तू, भौतिक साधने, टू-व्हीलर गाड्या आणि पशुधन वाहून गेले आहे. महादेव बळीराम कांबळे यांच्या दोन म्हशी व एक गाई तसेच ताराचंद बोडरे यांच्या १२ शेळ्या या पुरात बुडून मृत्युमुखी पडल्या आहेत.
पुराचा जोर एवढा प्रचंड होता की काँक्रीटमध्ये उभी केलेली संरक्षण भिंतसुद्धा कोसळली. ही भिंत पडल्यामुळे काहींची घरे वाचली, अन्यथा मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व संपत्तीचे नुकसान झाले असते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, हीच भिंत वादग्रस्त असून या भिंतीमुळेच पाणी अडवले गेले आणि पूरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.













