भावावर हल्ला केल्याचा बदला घेण्यासाठी केला खुन, तळेगाव दाभाडे येथील खुनाचा अवघ्या १२ तासात तपास ,अकरा आरोपींची नावे उघड.

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क

तळेगाव दाभाडे येथील सरस्वती विद्यालयासमोर जुन्या वादातून दिवसाढवळ्या एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याचे प्रकरण पिंपरी-चिंचवड पोलिसांनी उलगडले आहे. घटना उघडकीस आल्यानंतर १२ तासांच्या आत गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने गुन्ह्यात सहभागी असलेल्या ११ आरोपींची नावे उघड केली.त्‍यातील २ जणांना अटक केली. त्याच्यासोबत चार किशोरवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

 

शुक्रवारी (दि. ३१) सायंकाळी ५:४५ वाजता घडलेल्या या घटनेतील मृत तरुणाचे नाव आर्यन शंकर बेडेकर (वय १९, रा. सिद्धार्थनगर, तळेगाव स्टेशन, मावळ, पुणे) असे आहे. या प्रकरणात पोलिसांनी शिवराज भगना कोळी (वय २०, समता कॉलनी, वरळे, मावळ, पुणे) आणि सूरज लक्ष्मण निर्मळ (वय २२, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, पुणे) यांना अटक केली आणि त्यांचे साथीदार असलेल्या चार किशोरवयीन मुलांनाही ताब्यात घेतले. आता पोलिसांनी त्याच्या पाच फरार साथीदारांचा शोध सुरू केला आहे.

 

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर युनिट पाचचे पोलीस निरीक्षक किशोर पाटील आणि त्यांच्या पथकाने आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवून तपास केला. यानंतर वेगवेगळ्या पथकांनी वरील दोन्ही आरोपी आणि त्यांच्या साथीदारांना तळेगाव दाभाडे, वाल्हेकरवाडी, पुणे स्टेशन, सांगवी येथून ताब्यात घेतले.

चौकशी दरम्यान त्याने कबूल केले की शिवराजचा भाऊ संतोष कोळीवरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी त्याने आर्यन बेडेकरची हत्या केली. सर्व आरोपींना तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags