राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
लोणी काळभोर (पुणे) – दि. २ मे २०१५ रोजी सायंकाळी ५.३० ते ६.०० या वेळेत लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लॉजिंग आणि बार मालक-चालकांसोबत सुरक्षा विषयक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या बैठकीत उपस्थित आस्थापनांच्या मालक व चालकांना सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सूचना देण्यात आल्या. ग्राहकांची ओळख पटवून ती माहिती हॉटेलच्या रजिस्टरमध्ये अचूकपणे नोंदविणे, परदेशी नागरिक वास्तव्यास आल्यास ‘सी फॉर्म’ भरून त्याची प्रत पोलीस ठाण्यात सादर करणे, ग्राहक संशयास्पद वाटल्यास किंवा अधिक काळ वास्तव्यास असल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देणे, अशा महत्त्वाच्या बाबींचा समावेश होता.
तसेच, कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलीस ठाण्यात कळविणे याबाबतही सूचना करण्यात आल्या. या बैठकीत पोलिसांनी व्यावसायिकांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
बैठकीचा उद्देश परिसरातील सुरक्षेची पातळी अधिक सक्षम करणे आणि पोलिस व व्यावसायिक यांच्यात सुसंवाद राखणे हा होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी उपस्थितांना शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करत बैठकीची सांगता
केली.