पुणे : लोणी काळभोर पोलिसांनी गांजाची विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई करत एकाला अटक केली असून ₹२.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दि. ९ सप्टेंबर रोजी रात्री करण्यात आली.
आंद्रे वस्ती, सार्वजनीक रस्त्याच्या कडेला लोणी स्टेशन परिसरात गणेश रावसाहेब गोडसे (२५, रा. आंद्रे वस्ती, लोणी काळभोर, मूळगाव सोनेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापुर) हा त्याचा साथीदार अक्षय रवि पवार (रा. लोणी काळभोर) याच्यासह गांजा विक्रीच्या उद्देशाने थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
लोणी काळभोर पोलिसांनी तत्काळ धडक कारवाई केली. यात गोडसेला पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले. मात्र, त्याचा साथीदार अक्षय पवार हा पोलिसांना चकवा देत पसार झाला.
मिळालेला मुद्देमाल
गोडसेकडून विक्रीसाठी ठेवलेला १,१०४ ग्रॅम गांजा (किंमत ₹२२,०००/-) आणि मारुती अल्टो कार (किंमत ₹२,००,०००/-) असा एकूण ₹२,२२,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल व तपास
या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४०४/२०२५ नोंद करण्यात आली असून, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) व भारतीय न्याय संहिता कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल आहे.
गणेश रावसाहेब गोडसे याला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
उत्कृष्ट कामगिरी
ही कारवाई मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे व मा. सहायक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग सौ. अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सौ. स्मिता पाटील, सहा. पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे तसेच पो.हवा. भोसले, माने, नागलोत, क्षिरसागर, जगदाळे आणि पो.कॉ. गाडे, धुमाळ, कटके यांच्या पथकाने केली.