
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
लोणी काळभोर, ता. हवेली :
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ हवेली तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज लोणी काळभोर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. पत्रकारांवर झालेला हल्ला ही लोकशाहीला गालबोट लावणारी घटना असल्याचे मत यावेळी संघातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
हे निवेदन लोणी काळभोर गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्मिता पाटील यांनी स्वीकारले. या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस हवालदार मंगेश नानापुरे उपस्थित होते. पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गावगुंडांविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
पत्रकार समाजातील पीडित आणि अन्यायग्रस्तांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य करतात. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिले जाते. अशा परिस्थितीत पत्रकारांवर हल्ला होणे ही केवळ चिंताजनक बाब नसून लोकशाही व्यवस्थेला धक्का देणारी बाब आहे, असे मत हवेली तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पंढरीनाथ नामुगडे यांनी व्यक्त केले.
राज्य सरचिटणीस सिताराम लांडगे यांनी हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी स्पष्ट केले की, पत्रकारांवर होणाऱ्या अशा घटना समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देणाऱ्या आहेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे.
पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत व हल्लेखोरांना तातडीने अटक करून कायद्याच्या कचाट्यात आणावे, अशी मागणी संघाच्या निवेदनातून करण्यात आली.
या वेळी ज्येष्ठ पत्रकार शरद पुजारी,हवेली तालुका कार्याध्यक्ष तुषार काळभोर, सचिव विजय रणदिवे, उपाध्यक्ष गणेश धुमाळ, संघटक दिगंबर जोगदंड, प्रसिद्धीप्रमुख दीपक गिरी, सरचिटणीस ज्ञानेश्वर शिंदे, कार्यकारणी सदस्य अमन शेख, सहदेव खंडागळे, सुवर्णा कांचन, तुषार खोले आदींसह अनेक पत्रकार उपस्थित होते.
हवेली तालुका मराठी पत्रकार संघाच्या या निषेध नोंदविणाऱ्या निवेदनामुळे पत्रकार संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.










