किल्ल्याच्या जतन-दुरुस्तीला चालना; ऐतिहासिक वास्तू व स्मृतिस्थळांच्या संवर्धनाचा मार्ग मोकळा
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
हवेली : पुणे जिल्ह्यासह हवेली तालुक्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या किल्ले सिंहगडाच्या जतन व दुरुस्तीच्या कामासाठी सुमारे ९ कोटी रुपयांच्या कामाला चालना मिळाली आहे. या निर्णयामुळे सिंहगडाच्या ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन होऊन हवेलीच्या वैभवात आणखी भर पडणार असल्याची भावना हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासात सिंहगडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तू, तटबंदी आणि स्मृतिस्थळांचे जतन व संवर्धन करण्याची आवश्यकता सातत्याने व्यक्त होत होती.
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या माध्यमातून “Conservation and Repairs of Sinhgad Fort, Tal. Haveli, Dist. Pune – Part 3” या कामाची प्रक्रिया राबविण्यात आली असून या कामाची अंदाजित किंमत सुमारे ₹८.९६ कोटी आहे.
या कामामुळे किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तूंची आवश्यक जतन, संवर्धन आणि दुरुस्तीची कामे करण्यास चालना मिळणार आहे. सिंहगडावर येणाऱ्या शिवप्रेमी व पर्यटकांच्या दृष्टीनेही या संवर्धनाला विशेष महत्त्व आहे.
सिंहगडावर छत्रपती राजाराम महाराजांचे स्मृतिस्थळ तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांचे स्मारक असून या ऐतिहासिक स्थळांकडे शिवप्रेमी आणि पर्यटकांचा ओढा आणखी वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सिंहगड हा केवळ पर्यटनस्थळ नसून महाराष्ट्राच्या शौर्य, पराक्रम आणि गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारा ऐतिहासिक वारसा आहे. त्यामुळे या किल्ल्याचे मूळ ऐतिहासिक स्वरूप जपत संवर्धन करून हा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे अत्यंत महत्त्वाचे असल्याची भावना शिवप्रेमींनी व्यक्त केली.
सिंहगडाच्या जतन व दुरुस्तीसाठी भरीव तरतूद केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार भीमराव तापकीर, आमदार ज्ञानेश्वर कटके तसेच महायुती सरकारचे हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी हवेली तालुक्याच्या वतीने आभार व्यक्त केले.










