पुणे विभागात FDAचा धडाका; ४४० आस्थापनांना नोटिसा, ६९ परवाने निलंबित

पुणे विभागात FDAचा धडाका; ४४० आस्थापनांना नोटिसा, ६९ परवाने निलंबित
Facebook
Twitter
WhatsApp

पुणे : सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पुणे विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. १ ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत तब्बल ८४९ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी त्रुटी आढळलेल्या ४४० आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६९ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
या विशेष मोहिमेत मिठाई, खवा, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल तसेच उपवासासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध अन्नपदार्थांवर FDAने विशेष लक्ष केंद्रित केले. तपासणीदरम्यान ६७२ अन्न नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले.
भेसळ किंवा नियमबाह्य अन्नपदार्थांचा संशय असलेल्या ठिकाणांहून ४६ हजार २६६ किलोहून अधिक अन्नसाठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या साठ्याची किंमत सुमारे ₹१ कोटी ५२ लाख २४ हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत १७६ प्रकरणे दाखल करण्यात आली. त्यापैकी १६० प्रकरणे निकाली काढण्यात आली असून संबंधितांकडून ₹१८ लाख ४३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सणासुदीच्या काळात मिठाई, खवा, दूध व दुग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी असल्याने भेसळीचा धोका वाढतो. त्यामुळे नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना पॅकिंग, उत्पादन व अंतिम वापराची तारीख, FSSAI परवाना क्रमांक तसेच विक्रेत्याची विश्वासार्हता तपासावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
ठळक आकडे: ८४९ आस्थापनांची तपासणी; ४४० सुधारणा नोटिसा; ६९ परवाने निलंबित; ६७२ अन्न नमुने तपासणीसाठी; ४६,२६६ किलोहून अधिक साठा जप्त; जप्त मालाची किंमत ₹१.५२ कोटी; ₹१८.४३ लाख दंड वसूल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags