
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
भवरापुर येथील मुळा-मुठा नदीत चालकाचा खून करून मृतदेह फेकल्याच्या प्रकरणात अडकलेल्या पाच आरोपींना तब्बल साडेचार वर्षांनी माननीय न्यायाधीश डी. पी. रागीट न्यायालयाने निर्दोष घोषित करत मुक्तता दिली. आरोपींविरुद्ध कोणताही थेट, ठोस पुरावा सादर करण्यात न आल्यामुळे हा निर्णय दिला.
ही घटना ३ जानेवारी २०२१ रोजी घडली होती. रांजणगाव परिसरातील गौरव बाळू ढवळे, किरण भाऊसाहेब थिटे, दर्शन अनिल दांगट, भाऊसाहेब गौतम कुडूक आणि अविनाश रमेश परमेश्वरी या पाच तरुणांनी नाशिक जिल्ह्यातील वणी येथे जाण्यासाठी एक खासगी कॅब भाड्याने घेतली होती.
काही अंतर गेल्यानंतर, “निसर्गाच्या हाकेला प्रतिसाद देणे” या सबबीखाली त्यांनी कॅब थांबवण्याची विनंती चालक योगेश गर्जे (वय २५) यांना केली. त्यानंतर त्यांना कॅबमधून जबरदस्तीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. गर्जे यांनी प्रतिकार केला असता, त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि ठार मारून मृतदेह मुळा-मुठा नदीत फेकण्यात आल्याचा आरोप होता.
या प्रकरणाच्या तपासात सरकार पक्षातर्फे एकूण २१ साक्षीदार तपासण्यात आले, मात्र कोणताही थेट पुरावा न सापडल्याने आरोपींविरुद्धचा गुन्हा न्यायालयात सिद्ध होऊ शकला नाही. बचाव पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला की, संपूर्ण प्रकरण हे परिस्थितिजन्य पुराव्यांवर आधारित आहे. विशेष म्हणजे, तपास अधिकाऱ्यांनी आरोपींची कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) घेतले नाहीत, तसेच ओळख परेडही झाली नाही.
या सर्व बाबींचा विचार करून, माननीय न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी सर्व पाचही आरोपींना खुनाच्या आरोपातून निर्दोष घोषित करत न्यायालयातून मुक्त केले.
या प्रकरणात आरोपींच्या बाजूने सशक्त युक्तिवाद अॅड. विजेंद्र बडेकर आणि अॅड. आशिष सुराणा यांनी केला. त्यांना अॅड. सिद्धार्थ बाणे, अॅड. चांदणी भोजवानी-बडेकर, अॅड. तेजस सावंत, अॅड. हरी नरके, अॅड. अनिकेत थोरात आणि रोहन रुकुमूर यांनी सहाय्य के
ले.









