सभापती युवराज काकडे यांची कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट; आरोग्य सेवांचा घेतला सविस्तर आढावा

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा 

हवेली : हवेली पंचायत समितीच्या सभापतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कामाला वेग देत सभापती युवराज काकडे यांनी कुंजीरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देत आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व तत्पर आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने त्यांनी आरोग्य केंद्रातील विविध विभागांची पाहणी करून तेथील सुविधा, अडचणी व उपलब्ध मनुष्यबळाची माहिती प्रत्यक्ष जाणून घेतली.

या भेटीदरम्यान सभापती काकडे यांनी आरोग्य केंद्रातील ओपीडी विभाग, औषध वितरण कक्ष, प्रसूतीगृह, रुग्ण कक्ष तसेच परिसरातील स्वच्छतेची पाहणी केली. आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, औषधोपचार वेळेवर मिळावेत तसेच रुग्णांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाला दिल्या. औषधसाठा पुरेसा ठेवणे, परिसर स्वच्छ ठेवणे, रुग्णांशी नम्रतेने वागणे तसेच महिलांच्या प्रसूतीसाठी आवश्यक सुविधा व्यवस्थित उपलब्ध ठेवण्याबाबतही त्यांनी विशेष निर्देश दिले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. लोखंडे यांनी आरोग्य केंद्रात दिल्या जाणाऱ्या सेवा, उपलब्ध वैद्यकीय सुविधा, कर्मचारी संख्या तसेच परिसरातील गावांमधून येणाऱ्या रुग्णांची माहिती सभापती काकडे यांना दिली. काही आवश्यक सुविधा व साधनसामग्रीबाबत त्यांनी सभापतींच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळी बोलताना सभापती युवराज काकडे म्हणाले की, हवेली तालुक्यातील ७१ गावांमधील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, अंगणवाड्या तसेच शाळांना अचानक भेटी देऊन तेथील परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात येणार आहे. ग्रामीण भागात नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे आरोग्य, शिक्षण व बालविकास विभागाशी संबंधित सर्व ठिकाणी भेट देऊन तेथील समस्या समजून घेत त्या सोडवण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या पाहणीवेळी युवानेते संदेश आव्हाळे, पंचायत समिती सदस्य कृषिराज चौधरी, माजी सरपंच संतोषदादा कुंजीर, माजी उपसरपंच भरत निगडे, संतोष कुंजीर, पोलीस पाटील मिलिंद कुंजीर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष अमर कुंजीर, विकास निगडे, चंद्रकांत बारवकर, संजय झेंडे आदी उपस्थित होते. तसेच कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लोखंडे आणि आरोग्य विभागातील कर्मचारी वर्गही यावेळी उपस्थित होता.

सभापती युवराज काकडे यांच्या या अचानक भेटीमुळे आरोग्य यंत्रणेमध्ये तत्परता वाढण्यास मदत होणार असून ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक चांगल्या व कार्यक्षम आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी प्रशासनात हालचाल सुरू झाल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags