पुणे महानगर अध्यक्षपदी विजय रणदिवे यांची एकमताने निवड

Facebook
Twitter
WhatsApp

अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचा निर्णय; पत्रकारांच्या सशक्तीकरणासाठी ‘सक्षम पत्रकार कार्यशाळा’चे आयोजन

राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा

पुणे : अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना यांच्या पुणे महानगर अध्यक्षपदी विजय रणदिवे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष राजा माने यांच्या मान्यतेने ही निवड जाहीर करण्यात आली. विजय रणदिवे हे सुदर्शन टीव्ही चे पुणे ब्युरो चीफ म्हणून कार्यरत असून पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या निवडीप्रसंगी संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष अमोल पाटील व महेश कुगावकर विशेष उपस्थित होते. तसेच संघटनेला नवीन नेतृत्व मिळावे आणि तरुणांना संधी मिळावी या उद्देशाने स्वतःहून शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देणारे मावळते अध्यक्ष महेश टेळे पाटील हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्या या निर्णयाचे उपस्थितांनी कौतुक केले.

या कार्यक्रमाला पुणे शहरातील संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय पुणे शहरातील प्रिंट आणि डिजिटल माध्यमांमध्ये कार्यरत असलेल्या अनेक पत्रकारांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून नव्या नेतृत्वाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी पत्रकारांच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला. येत्या २९ मार्च रोजी पुणे शहरातील पत्रकारांसाठी “सक्षम पत्रकार कार्यशाळा” आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. या कार्यशाळेत पत्रकारांच्या व्यावसायिक कौशल्यवृद्धीसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार असून डिजिटल पत्रकारितेतील बदलत्या प्रवाहांबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

नूतन अध्यक्ष विजय रणदिवे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आगामी काळात पुणे शहरातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर संघटनेच्या माध्यमातून ठोस प्रयत्न केले जातील. विशेषतः पत्रकारांच्या घराच्या प्रश्नांवर उपाययोजना, वैद्यकीय मदतीसाठी योजना, तसेच पत्रकारांसाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच पुणे शहरातील पत्रकारांना एकत्रित आणून त्यांच्या हक्कांसाठी संघटितपणे काम करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय येत्या दोन दिवसांत पुणे महानगराची सविस्तर कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी नूतन अध्यक्ष विजय रणदिवे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष राजा माने, प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, महासचिव विकास भोसले तसेच राज्य व केंद्रीय पदाधिकाऱ्यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांचे अभिनंदन केले.

नवीन नेतृत्वाच्या माध्यमातून पुणे शहरातील डिजिटल व प्रिंट माध्यमातील पत्रकारांच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम होईल, अशी अपेक्षा उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags