
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
लोणी काळभोर :
लोणी काळभोर व परिसरात गुटखाबंदीची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, असा गंभीर प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. काही दिवसांपूर्वी लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत एका गुटखा कारखान्यावर धडक कारवाई करून मोठ्या प्रमाणात गुटखा साठा व बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले होते. या कारवाईनंतर परिसरातील गुटखा विक्री कायमस्वरूपी थांबेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.
मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच दिसत आहे. आजही लोणी काळभोर परिसरातील अनेक पानटपऱ्यांवर व काही ठराविक दुकानांमध्ये गुटखा सर्रास विकला जात असल्याची चर्चा आहे. काही होलसेलर त्यांच्या दुकानांतून गुप्तपणे पुरवठा करत असून, टपरी चालकांकडून खुलेआम विक्री सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
शाळा-मंदिरांच्या लगत विक्री; नियमांची पायमल्ली
शाळा, कॉलेज, मंदिर व रुग्णालयांच्या ठराविक अंतरात अशा प्रकारच्या विक्रीस कायद्याने बंदी असतानाही, शाळांच्या अगदी लगत असलेल्या पानटपऱ्यांवर गुटखा सहज उपलब्ध होत असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या येण्या-जाण्याच्या मार्गावरच व्यसनसामग्री विकली जात असेल, तर नव्या पिढीपुढे आपण कोणता आदर्श ठेवत आहोत? असा सवाल पालक व नागरिक उपस्थित करत आहेत.
“साखळी तोडा” – नागरिकांची ठोस मागणी
नागरिकांचे म्हणणे आहे की, जर एखादा गुटखा सेवन करणारा व्यक्ती पकडला, तर तो गुटखा ज्या दुकानातून घेतला ते समजू शकते. त्या टपरी चालकाकडून चौकशी केल्यास त्याला माल पुरवणारा होलसेलर उघड होऊ शकतो आणि पुढे साठेबाजांपर्यंत पोहोचता येऊ शकते. अशा पद्धतीने संपूर्ण पुरवठा साखळी उघड करणे अवघड नसल्याची भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
मात्र सर्वसामान्यांना सहज सुचणारी ही तपासाची दिशा प्रत्यक्षात का वापरली जात नाही? हा प्रश्न अनुत्तरित आहे. किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून प्रश्न सुटणार नाही; तर मूळ पुरवठादार व मोठ्या साठेबाजांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त होत आहे.
तरुणाई व्यसनाच्या विळख्यात?
वाढत्या गुटखा विक्रीमुळे परिसरातील तरुणाई व्यसनाधीनतेच्या मार्गावर जात असल्याची गंभीर चिंता व्यक्त होत आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात गुटखा साठा या भागात उपलब्ध असल्याची चर्चा असून, गुप्तपणे निर्मिती सुरू आहे का? याचाही सखोल तपास होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
गुटखाबंदी केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात प्रभावी व्हावी, शाळा-कॉलेज परिसर पूर्णपणे व्यसनमुक्त व्हावा आणि संपूर्ण साखळी उघड करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी ठाम मागणी आता जोर धरत आहे.
आता प्रशासन ठोस आणि सातत्यपूर्ण कारवाई करणार का? याकडे संपूर्ण लोणी काळभोर परिसराचे लक्ष लागले आहे.










