दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दरवाजे कायम खुले ठेवा – सभापती युवराज काकडे यांचा शिक्षकांना संदेश

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा

हवेली : “दिव्यांग असो वा सर्वसामान्य – प्रत्येक मुलाला शिक्षणाचा समान हक्क आहे. तालुक्यातील एकही दिव्यांग विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, हीच आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असा ठाम संदेश हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी दिला.

हवेली तालुक्यात आयोजित समावेशित शिक्षण सक्षमीकरण कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेत तब्बल 145 मुख्याध्यापक व शिक्षकांनी सहभाग घेतला. शिक्षणाच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

उपसभापती विद्याताई गायकवाड यांनीही शिक्षकांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणे सहन केले जाणार नाही. उलट, त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हेच खरे शिक्षण आहे.” त्यांनी पालक-शिक्षक संवाद अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.

कार्यशाळेत विविध तज्ञांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी, त्यांची ओळख आणि योग्य अध्यापन पद्धती यावर मार्गदर्शन केले. अध्ययन अक्षमता, समावेशित शिक्षणाचे महत्त्व, तसेच ‘प्रशस्त’ अॅपसारख्या उपयुक्त साधनांची माहिती शिक्षकांना देण्यात आली.

विशेष शिक्षिका सुवर्णा पुंडे यांनी कायद्यानुसार असलेल्या 21 दिव्यांग प्रवर्गांबाबत सविस्तर माहिती दिली, तर संतोष देशमुख यांनी आनंददायी शिक्षण पद्धती आणि शासनाच्या विविध सवलतींचा आढावा मांडला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गटशिक्षणाधिकारी हेमंतकुमार खाडे यांनी शिक्षकांच्या एकजुटीमुळे शिक्षणाचा दर्जा उंचावेल, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यशाळेचे नियोजन आणि अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी शिक्षकांनी घेतलेली मेहनत विशेष लक्षवेधी ठरली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनही प्रभावीपणे पार पडले.

समावेशित शिक्षणाच्या या उपक्रमामुळे हवेली तालुक्यात “कोणीही मागे राहणार नाही” हा संदेश अधिक ठामपणे पोहोचला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags