
पक्षकार्याची दखल; कार्यकर्त्यांकडून समाधान व्यक्त
हडपसर (विशेष प्रतिनिधी):
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदी मिनाजताई मेमन यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
या प्रसंगी उपमहापौर परशुराम वाडेकर, प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्राचे मोहन जगताप, शहर सरचिटणीस महिपाल वाघमारे, नगरसेवक निलेश आल्हाट, नगरसेविका निशा माळवदकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मिनाजताई मेमन यांनी हडपसर परिसरात महिला आघाडीच्या माध्यमातून प्रभावी काम करत पक्षाची ताकद वाढवली आहे. अनेक भागांमध्ये महिला शाखांची स्थापना करून त्यांनी शेकडो महिलांना पक्षाशी जोडले आहे. महिलांवरील अन्याय-अत्याचारांविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करणारी लढाऊ नेत्या म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.
नियुक्तीनंतर बोलताना मिनाजताई मेमन म्हणाल्या की, “पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार. आदरणीय रामदास आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा लोककल्याणाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक जोमाने काम करणार आहे.”
दरम्यान, या फेरनिवडीबद्दल हडपसर मतदारसंघासह पुणे शहरातील आरपीआय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून समाधान व्यक्त केले आहे.










