राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
पुणे, हवेली : हवेली पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतींना मिळणारे मुद्रांकशुल्क अनुदान अद्याप वर्ग न झाल्यामुळे तालुक्यातील गावपातळीवरील विकासकामांना मोठा फटका बसत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुषण जोशी यांच्याकडे निवेदन सादर करत तात्काळ निधी वितरणाची मागणी केली आहे.
मार्च अखेर जवळ येत असताना निधीअभावी पाणीपुरवठा, रस्ते, वीज, स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांच्या कामांवर परिणाम होत असून अनेक विकासकामे रखडली आहेत. त्यामुळे गावपातळीवरील नियोजित कामांना गती देणे कठीण बनले आहे. यामुळे हवेली तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींकडून पंचायत समितीकडे वारंवार विचारणा होत आहे.
दरम्यान, राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ ३१ मार्च २०२६ रोजी संपत असून या अभियानांतर्गत असलेल्या योजनांची वेळेत अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. मात्र, निधीअभावी अनेक कामे अपूर्ण राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर हवेलीतील सर्व ग्रामपंचायतींच्या खात्यावर प्रलंबित मुद्रांकशुल्क अनुदान तात्काळ वर्ग करण्यात यावे, अशी ठाम मागणी सभापती काकडे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे. तसेच पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन कार्यवाही करावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.










