सिनेक्रॉन कंपनीकडून जिल्हा परिषद शाळा थेऊरला संगणक संच भेट

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा 

थेऊर (प्रतिनिधी):

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणाला चालना देण्याच्या उद्देशाने सिनेक्रॉन कंपनीने आपल्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा, थेऊर येथे संगणक संच भेट देऊन एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होणार असून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यास मोठी मदत होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

कार्यक्रमावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सिनेक्रॉन कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रशांत वारघडे आणि व्यवस्थापक बाळासाहेब भोसले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “डिजिटल शिक्षण ही आजच्या काळाची गरज असून विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाची संधी मिळणे अत्यंत आवश्यक आहे.”

शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिलावती पवार यांनी कंपनीचे आभार मानताना सांगितले की, “या संगणक संचामुळे विद्यार्थ्यांना ई-लर्निंग, प्रोजेक्ट्स तसेच ऑनलाइन अभ्यासक्रमांचा लाभ घेता येईल. यामुळे शिक्षकांनाही अध्यापन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.”

तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. गणेश गोरसे यांनीही सिनेक्रॉन कंपनीचे विशेष आभार मानले.

सदर संगणक संच मिळवण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री. दीपक गायकवाड, श्री. संतोष कोष्टी व श्रीमती अनुराधा तकटे यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मधुकांत आगळे यांनी केले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संगणक शिक्षणाविषयीची आवड वाढून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवे मार्ग खुले होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags